कणकवली : उपजिल्हा रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांवर चांगले उपचार करण्यात यावेत. अद्यापही सिंधुदुर्गात कोरोनाचा रूग्ण आढळलेला नाही . त्यामुळे यापुढील काळातही चांगली काळजी घ्या. अशा सुचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर १४४ कलम लागू केले आहे. राज्यातील नागरीकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी स्वत:हून काळजी घेण्याची गरज आहे. महत्वाच्या कामाव्यतिरिक्त नागरीकांनी घराबाहेर पडू नये, अशा सुचना सामंत यांनी दिल्या.
कणकवली उपजिल्हा रूग्णालय येथे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला आमदार वैभव नाईक, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, तहसिलदार आर. जे. पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, रूग्णालय अधिक्षक डॉ़ सहदेव पाटील आदी उपस्थित होते.कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरण कामा अंतर्गत उड्डान पुलाचे काम सुरू असल्याने अनेक कामगार एकत्र येत आहेत. राज्यात १४४ कलम लागू असल्याने पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र असल्यास कायद्याचा भंग होतो. त्यामुळे महामार्ग उड्डान पुलाचे काम थांबविण्यात यावे, असे निर्देश प्रांताधिकाऱ्याना पालकमंत्र्यांनी दिले.जमावबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी. आतापर्यंत ज्या गतीने कोरोना व्हायरसचा देशात प्रसार होत आहे. तो प्रसार सिंधुदुर्गात होवू नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी. अशा सूचना उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्यानंतर पालकमंत्री आणि अधिकारी यांनी कणकवली शहरातील पाहणी केली. तसेच कोरोनाशी लढा देण्यासाठी जनतेने सहकार्य करावे . असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.