खारेपाटण : खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एका पुरुष कर्मचाऱ्याचा स्वॅब तपासणी अहवाल चार दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रविवारी पुन्हा या आरोग्य केंद्राच्या आणखी २ कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागात खळबळ माजली आहे.
यामुळे खारेपाटणमध्ये कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता ४५ वर जाऊन पोहोचली आहे. सध्या सक्रिय रुग्ण संख्या ४ आहे. ४० रुग्ण हे बरे होऊन घरी परतले असून एकाचा मृत्यू झाला आहे.खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सहाय्यकाचा स्वॅब तपासणी अहवाल ९ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण १६ कर्मचाऱ्यांनी आपले स्वॅब तपासणीसाठी दिले होते. यापैकी १३ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. एका कर्मचाºयाचा अहवाल अजून येणे बाकी आहे.रविवारी आरोग्य सेवक आणि आरोग्य सहाय्यक अशा २ पुरुष कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना बाधित कर्मचाऱ्यांची संख्या ही आता ३ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी एक कर्मचारी हा तळेरे येथे राहत असून दुसरा कर्मचारी हा जानवली येथे राहत आहे.भीतीचे वातावरणखारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र पहिला कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पुढील दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले होते. संपूर्ण आरोग्य केंद्राची इमारत निर्जंतूक करण्यात आली होती. खारेपाटणमध्ये आरोग्य खात्याचे कर्मचारीच आता बाधित येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.