मालवण : कोरोना स्वॅब टेस्ट करून घ्या या पालिका प्रशासनाच्या फर्मानानंतर मालवण शहरातील भाजी विक्रेते आक्रमक झाले आहेत. आरोग्य तपासणीनंतर आता स्वॅब टेस्ट सक्ती म्हणजे भाजी विक्रेत्यांना नाहक त्रास देण्याचा प्रकार आहे. पालिकेची मनमानी सहन करण्यापेक्षा बेमुदत भाजी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय भाजी विक्रेत्यांनी घेतला आहे.दरम्यान, भाजी विक्रेत्यांना लक्ष्य करण्यापेक्षा संपूर्ण बाजारपेठेत स्वॅब टेस्ट करून घेण्याचे धोरण पालिकेने आखावे. सर्वच व्यापाऱ्यांची तपासणी करावी. केवळ भाजी विक्रेत्यांना पालिका प्रशासनाने त्रास देऊ नये, अशी भूमिका भाजी विक्रेत्यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेला काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळू अंधारी यांनी पाठिंबा दर्शविला आहे.नगरपालिकेकडून होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ भाजी विक्रेत्यांनी मंगळवारपासून बेमुदत बंद पुकारला आहे. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळू अंधारी यांच्या नेतृत्वाखाली भाजी विक्रेत्यांनी एकत्र येत ही घोषणा केली.यावेळी सरदार ताजर, बशीर अथनीकर, देवदत्त माडये, रहीम मुल्ला, मुश्ताक अथनीकर, शफी खान, सविता गावकर, नरेश गावकर, जीवन धुमाळ, इलाई अथनीकर, विराज किर, सलीम ताजर, मुबारक अथनीकर, वंदना मसुरकर, आशा फर्नांडिस, काँग्रेस कार्यकर्ते प्रभाकर हेदुळकर आदी उपस्थित होते.ते माल घेऊन येतात त्यांचे काय ?शहरातील हॉटेलमध्ये कुडाळमधून भाजी आणली जाते. त्यामुळे संबंधित हॉटेल व्यावसायिकांचीदेखील तपासणी करा. किराणा दुकानात येणारा माल, कांदे, बटाटे आणणारे ट्रक येतात. त्यांचे चालक कुठले असतात? ते बाहेरून येतात. मग आम्हांलाच वेठीस का धरले जाते? जर आम्हांला नाहक त्रास दिला जाणार असेल तर आम्ही भाजी विक्री करणार नाही, असे सांगत भाजी विक्रेत्यांनी बंदची भूमिका घेतली आहे.कोरोनाची लागण झालेल्या कुडाळमधील भाजी विक्रेत्याकडून मालवण शहरात भाजी घेतली जाते. त्यामुळे मालवण नगरपालिकेने मागील आठवड्यात भाजी विक्रेत्यांना आरोग्य तपासणी सक्तीची केली होती. त्यामुळे विक्रेते आक्रमक झाले.सोमवारी अचानक पालिकेने भाजी विक्रेत्यांना ओरोसला जाऊन स्वॅब तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. भाजी विक्रेत्यांना पालिका कर्मचारी अरेरावी करीत असून दोन कर्मचारी विक्रेत्यांकडून फुकट भाजी नेत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.
corona virus : भाजी विक्रेत्यांचा बेमुदत बंद, मालवण पालिकेकडून स्वॅब टेस्ट सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 5:57 PM
कोरोना स्वॅब टेस्ट करून घ्या या पालिका प्रशासनाच्या फर्मानानंतर मालवण शहरातील भाजी विक्रेते आक्रमक झाले आहेत.
ठळक मुद्देभाजी विक्रेत्यांचा बेमुदत बंद, मालवण पालिकेकडून स्वॅब टेस्ट सक्ती भाजी विक्रेते आक्रमक, सर्व व्यापाऱ्यांच्याच टेस्टची मागणी