सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरी कोरोनाबाबतची भीती मात्र कमी होत चालली आहे. परिणामी जिल्ह्यातील शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ४२.४२ टक्के एवढीच आहे. ४२ हजार ४२४ विद्यार्थी संख्येपैकी १८ हजार विद्यार्थी उपस्थित आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. सुरुवातीच्या काळात याला पालक व विद्यार्थ्यांकडून फार कमी प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मात्र शाळा सुरू होण्याचे प्रमाण वाढले.२४७ शाळांपैकी सध्या २१६ शाळा सुरू आहेत. हे प्रमाण ८७.४४ टक्के इतके आहे. तर उर्वरित शाळांमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सिंधुदुर्गात कमी झाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढतच नाही.