वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज १४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून यात वेंगुर्ला तालुक्यातील मातोंडमधील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती १८ मे ला मुंबईवरुन गावात दाखल झाली होती. येथील एका प्राथमिक शाळेत त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
यानंतर त्याला काही लक्षणे आढळू लागल्याने २० मे ला ओरोस जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. २१ मे ला त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. आज त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.आता या रुग्णाच्या संपर्कातील १० व्यक्तींना ओरोसला तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या व्यक्तीसोबत त्या १० व्यक्ती शाळेत संस्थात्मक विलगीकरणात होत्या. दरम्यान, या सर्वांची प्रकृती आता चांगली असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन वेंगुर्ला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांनी केले आहे.दरम्यान, त्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीसोबत त्याची पत्नी, २ मुले, भाऊ, भावजय व पुतणे हे सुद्धा त्यांच्यासोबत मुंबईवरुन मातोंड-मिरीस्तेवाडी येथील प्राथमिक शाळेत विलगीकरणात होते. तसेच त्यांच्या सोबत अजूनही ४ व्यक्ती असे मिळून हे सर्व ११ जण त्याच शाळेत विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यामुळे या व्यक्तीच्या संपर्कातील इतर १० जणांना तपासणीसाठी ओरोस याठिकाणी नेण्यात येणार आहे.यावेळी तहसीलदार प्रविण लोकरे, गटविकास अधिकारी उमा पाटील, पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर, सरपंच जानवी परब, ग्रामविकास अधिकारी तुषार हळदणकर, तलाठी एस.पी.गवस, कृषी सहाय्यक चंद्रशेखर रेडकर, मातोंड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभू, आरोग्यविका कांबळे, मेस्त्री यांनी येथील प्राथमिक शाळेच्या ठिकाणी पाहणी केली.प्रशासनाकडून हलगर्जीपणा : जान्हवी परब४मातोंडमधील तो कोरोना रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने पाहणी केल्यानंतर प्राथमिक शाळेच्या ३०० मीटर अंतरावरील परिसरात तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी कंटेन्मेंट झोन जाहीर केला. मात्र दुपारी ३.३० पर्यंत याठिकाची रहदारी सुरुच होती. शाळेच्या समोरुन होडावडा- मातोंड मुख्य रस्ता जात असून याठिकाणी दुपारपर्यंत माणसांची, गाड्यांंची ये-जा सुरुच होती.
पोलीस यंत्रणाही याठिकाणी तैनात करण्यात आली नसल्याने सरपंच जानवी परब यांनी खंत व्यक्त केली. तर रात्री १२ वाजता या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊनही आज दुपारपर्यंत प्रशासनाकडून तो परिसर बंद करण्यात आला नसल्याने गावात भीतीचे वातावरण होते. याबाबत दुपारी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी स्थानिक ग्रामस्थांनी संपर्क साधल्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्याचे त्यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती सरपंच यांनी दिली.