- सचिन खुटवळकर दोडामार्ग/जिल्हा सिंधुदुर्ग : कोरोनाचा फटका लोककलाकारांनाही बसला असून, दशावतारी कंपन्यांचे मालक व कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊन व संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग व गोव्यासह मुंबईतील हजारो नाट्यप्रयोग रद्द झाल्यामुळे दशावतारी राजाचा दरबार ठप्प झाला आहे.कार्तिक पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या जत्रा व दशावतारी नाटकांच्या माध्यमातून कलाकार आपली उपजीविका चालवितात. वर्षातील सहा महिनेच ही नाटके होतात. त्यामुळे उर्वरित निम्मे वर्ष या कलेच्या माध्यमातून मिळणाºया तुटपुंज्या मानधनातूनच त्यांना उपजीविका चालवावी लागते. ९० टक्क्यांहून अधिक कलाकारांना नाटकांतून मिळणारे मानधन हाच आधार असतो. कोरोनामुळे हा आधारही हातचा गेल्यामुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत त्यांना पडली आहे, अशी माहिती नामवंत दशावतारी कलाकार, नाट्यलेखक दत्तप्रसाद शेणई यांनी दिली.जत्रांच्या माध्यमातून वार्षिक कराराप्रमाणे अतिशय तुटपुंजी रक्कम दशावतारी कंपन्यांच्या मालकांना मिळते. त्यात फायदा कमी व तोटाच जास्त, अशी स्थिती असते. जत्रांचा हंगाम संपल्यानंतर मार्च, एप्रिल व मे महिन्यात गावोगावी उत्सवानिमित्त दशावतारी नाटकांचे आयोजन केले जाते. त्यातून थोडीफार कमाई होते. मात्र यावर्षी जत्रांचा कालावधी संपतानाच कोरोनाचे संकट आल्यामुळे नियोजित नाट्यप्रयोग रद्द झाले आणि मोठे आर्थिक संकट कोसळले. महाराष्ट्र सरकारने याची दखल घेऊन दशावतारी लोककलाकारांना आर्थिक हातभार द्यावा, अशी मागणी बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतार नाट्यमंडळाचे मालक बाळकृष्ण ऊर्फ दिनेश गोरे यांनी केली आहे.गोरे म्हणाले, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सरकारतर्फे मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले आहे. अन्य लोकप्रतिनिधींनीही आपल्या परीने हा विषय सरकारच्या निदर्शनास आणून दिला आहे. लोकाश्रयाच्या बळावर गेली ८०० वर्षांहून अधिक काळ ही कला टिकून आहे. आता सरकारच्या मदतीवरच आमची मदार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कधी आटोक्यात येईल व पुन्हा दशावताराला उभारी येईल, हे अनिश्चित आहे.आर्थिक साह्य मिळावेयावर्षीचा व्यवसाय पूर्णत: तोट्यात गेला. कलाकारांना मानधनाची रक्कम आगाऊ द्यावी लागते. त्यासाठी पतसंस्था, बँकांकडून कर्ज घ्यावे लागते. ते कर्ज कसे फेडावे, याची चिंता आम्हाला आहे. कंपनीच्या वाहनांचे हप्ते थकले आहेत. कलाकारांबरोबरच कंपन्यांचे मालक-चालक यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार पातळीवर विशेष आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.मानधनावरच चालते घरनाट्यप्रयोगांतून कलाकारांना चांगली कमाई होते. मात्र, यावर्षी त्यावरही पाणी सोडावे लागले आहे. आमच्यापैकी बहुतेक कलाकारांचे घर दशावतारी नाटकातून मिळणाºया मानधनावरच चालते. सरकारच्या मदतीकडे आम्ही डोळे लावून आहोत. सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तो प्रत्यक्षात उतरावा, ही अपेक्षा.- दत्तप्रसाद शेणई, कलाकार
CoronaVirus: कोरोनाचा फटका; ‘दशावतारी’चा दरबार ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 2:31 AM