सिंधुदुर्ग : गोव्यात कामधंद्यानिमित्त राहणाऱ्या आणि मुळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३४ युवक-युवतींना जिल्ह्यात घेण्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी परवानगी दिल्यानंतर शनिवारी रात्री त्यांच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला. लॉक डाउनच्या पाश्वेभूमीवर ते गोव्यात अडकून पडले होते.दरम्यान या सर्वांची सावंतवाडी येथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना क्वारटाईनमध्ये ठेवायचे की अन्य काही याबाबतचा निर्णय होणे बाकी आहे. गोव्यात अडकलेल्या त्या ३४ जणांना सिंधुदुर्गात आणण्यासाठी शनिवारी दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रयत्न केले होते.गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रशासनाशी बोलून त्या सर्वांना सिंधुदुर्ग च्या हद्दीपर्यंत आणण्यात आले होते. मात्र, सिंधुदुर्ग चे पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी आंतरराज्य बंदीच्या निर्णयाबाबत कठोर भूमिका घेऊन त्यांना प्रवेश नाकारला होता. त्यानंतर त्या सर्वांना गोवा प्रशासनाने पुन्हा ताब्यात घेतले होते. याबाबत सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी सायंकाळी याबाबतीत निर्णय घेतल्यानंतर त्या ३४ जणांची रात्री उशिरा घरवापसी झाली.
coronavirus : अखेर त्या ३४ जणांची सिंधुदुर्गात घरवापसी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 8:00 AM