कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथील नव्याने सुरू होऊ घातलेल्या विशेष महिला व बाल रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली. या इमारतीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली अपूर्णावस्थेतील कामे पूर्ण करण्याबाबतचा आढावाही घेतला.माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी २०१४ मध्ये या महिला रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले होते. आता ६ वर्षे होत आली असून इमारत पूर्ण होऊनही काही कामे अपूर्णावस्थेत आहेत.सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन याठिकाणी हे रुग्ण ठेवता येतील का? यादृष्टीने १० एप्रिल रोजी या रुग्णालयाची पाहणी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली होती. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे रुग्णालय चालू करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. परंतु आतापर्यंत कोणतीही कामे पूर्ण झालेली दिसून येत नाहीत.दरम्यान, मंगळवारी या रुग्णालयाची पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार वैभव नाईक यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, संतोष शिरसाट, मंजुनाथ फडके, सुशिल चिंदरकर यांच्यासह प्रांताधिकारी वंदना खरमाळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र हुलावळे, विद्युत उपअभियंता, शाखा अभियंता आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. इमारतीची पाहणी करीत इमारतीमधील अपूर्णावस्थेत असलेली कामे पूर्ण करण्याचा दृष्टीने तत्काळ कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना दिल्या. आमदार वैभव नाईक यांनीही बांधकाम अधिकाऱ्यांना या रुग्णालयाच्या प्रलंबित कामांसंदर्भात सूचना केल्या.