कणकवली : कणकवली शहरातील संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये सध्या १४९ व्यक्ती ठेवण्यात आल्या आहेत . यापेक्षा अधिक संख्या वाढली तर हॉटेल, लॉज, मंगल कार्यालये आणि महाविद्यालयांचे वर्ग घेण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.
याखेरीज शहरातील हॉटेल आणि लॉजमध्ये पेड क्वारंटाईनचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे यांनी दिली.कणकवली नगरपंचायतीच्या कार्यालयात नगराध्यक्षांच्या दालनात सोमवारी संयुक्तरित्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अॅड. विराज भोसले उपस्थित होते.बंडू हर्णे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कणकवली नगरपंचायतीने शहरात सनियंत्रण समिती स्थापन केल्या आहेत. १७ प्रभागात या समित्या कार्यरत आहेत.
या समितीचे नगराध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष व मुख्याधिकारी सचिव आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक अवधूत बनकर, अॅड. उमेश सावंत, डॉ. विद्याधर तायशेट्ये यांच्यासह नगरपंचायतीचे मनोज धुमाळे, विठ्ठल साटम, प्रियंका सोन्सूरकर, भगवान कदम आदी नोडल अधिकारी आहेत. नगरसेवकांबरोबरच आरोग्यसेवक व स्थानिक सदस्यही या समितीत आहेत.
सद्यस्थितीत वागदे येथील हॉटेल नाजुका, परमहंस भालचंद्र महाराज संस्थान भक्तनिवास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह हरकुळ बुद्रुक आणि फोंडाघाट येथील नामदेवराव मराठे यांचे कॉलेज ताब्यात घेण्यात आले आहे.वागदे येथील हॉटेल नाजुकामध्ये ३०, परमहंस भालचंद्र महाराज संस्थान भक्त निवासमध्ये २० जणांची व्यवस्था संस्थात्मक क्वारंटाईनसाठी करण्यात आली आहे. शहरात येणारे नागरिक सर्वप्रथम शासकीय उपजिल्हा रुग्णालयात जातात. तेथून त्यांना नगरपंचायतीकडे पाठविले जाते. यात रात्री-अपरात्री आलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्ष उपलब्ध होईपर्यंत अनेक तास वाट पहावी लागते.त्यामुळे ज्या नागरिकांचे नातेवाईक कणकवली शहरात येणार आहेत त्यांनी क्वारंटाईन कक्षासाठी आधीच नावनोंदणी करावी. जेणेकरून त्या प्रवाशांची उपजिल्हा रुग्णालयात तपासणी झाल्यानंतर त्यांची थेट विलगीकरण कक्षात रवानगी करता येईल.
भविष्यात शहरात येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ पाहता नगरपंचायत विलगीकरण कक्षासाठी अन्य पर्याय शोधत आहे. त्याचप्रमाणे पेड क्वारंटाईनची सुविधा देऊ इच्छिणाऱ्या हॉटेल मालकांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही बंडू हर्णे यांनी यावेळी केले.