सावंतवाडी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी केली असून, दुचाकी फिरविण्यास बंदी घातली असतानाही शहरात दुचाकीवरून फिरणाऱ्या युवकांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. अनेकांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या. त्याशिवाय दंडही केला. सावंतवाडी शहरात प्रत्येक नाक्यावर नाकाबंदी करण्यात आली होती. यात बापूसाहेब पुतळा, शिवाजी चौक, शिरोडा नाका तसेच तीन मुशी जवळ तसेच परूळेकर हॉस्पीटलजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी प्रत्येक दुचाकीची तपासणी पोलीस करीत होते.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असतानाही काही जण शहरात तसेच शहराच्या ग्रामीण भागात बिनधास्तपणे दुचाकीची सफर करताना दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक नाक्यावर नाकाबंदी करण्याचे ठरवले. त्यानुसार गेले तीन दिवस पोलीस प्रत्येक नाक्यावर नाकाबंदी करत आहेत.शहराच्या प्रमुख भागात पोलिसांची नेहमीच नाकाबंदी असते पण काही युवक हे पोलीस मुख्य मार्गावर असले की आतील भागात दुचाकीचा फेरफटका मारताना दिसतात. त्यामुळे पोलिसांनी गेले दोन दिवस शहराच्या आतील भागात नाकाबंदी करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे प्रथमच परूळेकर हॉस्पीटलजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली.यावेळी मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी अनेकांच्या दुचाकी ताब्यात घेत कारवाई केली. तर दुसरीकडे जयप्रकाश चौकात तर सकाळच्यावेळी भाजी खरेदीसाठी काही जण येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तेथेही नाकाबंदी करत दुचाकीवर कारवाई केली.
तसेच तीन मुशीजवळ ओरोस येथील वाहतूक पोलिसांनी सकाळपासूनच नाकाबंदी केली होती. यावेळी अनेकजण पोलिसांना सापडले. या सर्वांवर पोलिसांनी कारवाई केली. हा मुख्य मार्ग असल्याने अनेक दुचाकी बरोबरच चारचाकी वाहनेही पोलिसांनी तपासली. त्यावेळी अनेकजण काही कारण नसताना शहरात फेरपटका मारण्यासाठी येत असल्याचे दिसून आले. अशावर पोलिसांनी कारवाई केली.तसेच नगरपालिकेजवळ पोलिसांची कायमच नाकाबंदी असते. तर बापूसाहेब पुतळ्याजवळ तर पोलिसांनी बॅरेकेटस् करून नाकाबंदी केली होती. त्यामुळे तेथे सर्व गाड्या तपासल्या जात होत्या. पोलिसांनी राबवलेल्या या कडक मोहिमेनंतर अनेकजण शहरातून दुचाकी फिरवताना दिसत नव्हते. तसेच बाजारातील गर्दी ही कमी झाली होती.मासे खरेदी अंगलटकाहीजण सावंतवाडी शहरातील माठेवाडा भागात मासे खरेदीसाठी आले होते. त्याचवेळी पोलिसांनी परूळेकर हॉस्पीटलनजीक नाकाबंदी लावून कारवाई सुरू केली होती. त्यामुळे मासे खरेदीसाठी आलेले अनेक जणांना या कारवाईला सामोरे जावे लागले. मासे खरेदीसाठी अनेकजण दुचाकी घेऊनच आले होते.