दोडामार्ग : गोव्यातून कुंब्रलमार्गे चंदगडला होत असलेली दारू वाहतूक कुंब्रल येथील स्थानिक युवकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. या कारवाईत ३ लाख ४५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सतीश भीमराव आरदाळकर (३१, रा. हडकुळ, ता. चंदगड, कोल्हापूर), अतुल वसंत शिंदे (२६ रा. सदर), श्रीशैल अशोक बिराजदार (२८) यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. ग्रामस्थांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद असून पोलीस यंत्रणेचे अपयश मात्र स्पष्ट दिसत आहे.राज्य व जिल्हा सीमा बंद असतांना गोव्याहून कुंब्रलमार्गे गेले चार दिवस रात्रीची एका चारचाकी वाहनाने दारू वाहतूक चालू होती. रात्रीच्या वेळी संशयास्पद होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवीत युवकांनी सापळा रचून रस्त्यावर दगड ठेवले व ग्रामस्थ लपून बसले. दरम्यान, वाहन आल्यावर रस्त्यात दगड पाहून चालकाने गाडी उभी केली. त्यावेळी ग्रामस्थांनी गाडीला घेराव घालत गाडीचा तपास केला. त्यावेळी दारू वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी लगेच दोडामार्ग पोलीस ठाण्यात कळविले.पोलीस उपनिरिक्षक बागल व सहकारी यांनी त्याठिकाणी धाव घेतली व दारू वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले. तसेच वाहतुकीस सहाय्य करणाऱ्या दुचाकी चालकास ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत ३ लाख ४५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यातील आरोपी सतीश आरदाळकर, अतुल शिंदे, श्रीशैल बिराजदार यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कुंब्रल रुमडाची गोठण व बोर्डेकरवाडी युवकांनी डोळ्यात तेल घालून केलेली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. मात्र, पोलिसांचे दारू वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.सीमा बंद असतानाही राजरोस दारू वाहतूककोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य व जिल्हा सीमा बंद करून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीमा ओलांडून जाणे या घडीला तरी शक्य नाही. मात्र, कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानादेखील गोवा राज्यातून दोडामार्ग सीमेवरून चंदगडच्या दिशेने गेले चार दिवस राजरोसपणे दारू वाहतूक चालू होती. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेने याचा पर्दाफाश झाला.
चोख बंदोबस्त असताना सीमा ओलांडून दारूने भरलेली गाडी आलीच कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर पोलीस व दारू विक्रेते यांच्या संगनमताशिवाय लाखोंची दारू वाहतूक होऊ शकत नसल्याचीही तालुक्यात चर्चा होती.