सिंधुदुर्ग : मुंबई, पुणे तसेच बाधीत क्षेत्रातून आंबा वाहतूक करून परत आलेल्या वाहन चालकाने गावात जाऊन आंबा गोळा करू नये, तसेच गावातून आंबा गोळा करणारा व जिल्ह्याबाहेर त्याची वाहतूक करणारा असे दोन्ही वाहनचालक वेगवेगळे असावेत.
आंबा व माल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी ठेकेदार व बागायतदार यांनी विलगीकरणाची सोय करून त्याच्यासाठी सर्व अत्यावश्यक सुविधा पुरवाव्यात असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.आंबा व माल वाहतुकीतील वाहन चालकांसाठी संबंधित ठेकेदार यांनी विलगीकरणासाठी जागा निश्चित करावी, सदर जागा शक्यतो तपासणी नाक्याच्याजवळ असावी. वाहनचालकास पुढील फेरीसाठी पाठवताना विलगीकरण केंद्रातूनच पाठवावे.
प्रत्येक फेरीनंतर वाहनचालकांची आरोग्य तपासणी करावी. वाहन चालकास कोरोनाची लक्षणे आढळल्यास संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत कोरोना केअर सेंटरमध्ये रवानगी करावी. प्रत्येक फेरीनंतर सीमेवरच गाडीचे निर्जंतुकीकरण करावे.वाहन चालक मुंबई, पुणे किंवा बाधीत क्षेत्रातून आंबा, माल वाहतुकीच्या त्याच्या फेऱ्या पूर्ण केल्यानंतर गावात किंवा वॉर्डात आल्यावर ग्रामस्तरीय, वॉर्डस्तरीय नियंत्रण समितीचे त्यांना ग्रामस्तरीय, वॉर्डस्तरीय संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठवावे.
चालक बाधित क्षेत्रातून आला असल्यास संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याचा स्वॅब घेऊन तपासणी करिता पाठवावा. ग्रामस्तरीय, वॉर्डस्तरीय नियंत्रण समितीने १ मे रोजीच्या आदेशांमध्ये नमुद सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी. यासाठी संबंधित गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्राकरिता नोडल अधिकारी म्हणून काम पाहण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.