सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या कसाल येथील गरजू दिव्यांग बांधवांना डॉ. प्रशांत कोलते व डॉ. दर्शना कोलते यांच्यावतीने कडधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले.कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन केले आहे. सव्वा महिना लॉकडाऊन असल्याने गरिबांचे खाण्या-जेवणाचे हाल होत आहेत. काही स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, डॉक्टर यांसह काही व्यक्ती सढळ हस्ते गरजूंना मदत करताना दिसत आहेत.
काही जण वस्तू स्वरूपात तर काहीजण जेवण देऊन मदत करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर डॉ. कोलते यांनी गरजूंना तांदुळ, डाळ, साखर, कांदे, बटाटे, वाटाणे, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा साईकृपा बहुउद्देशीय शिक्षण संस्थच्या वैदेही वरक, कविता शिंगाडे, भागिरथी शिंगाडे, दिव्यांग कक्षेतील सदस्य शामसुंदर लोट, रुपेश बांदेकर उपस्थित होते. संस्थाध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी डॉ. कोलते यांचे आभार मानले.