सावंतवाडी : गेल्या पंधरा दिवसांत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ५० हजार चाकरमानी आले आहेत. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या विरोधात गैरसमज आणि संभ्रम निर्माण करू नये. इतर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जसे मुख्यसचिव व महासंचालक यांना पत्र दिले. तसेच पत्र सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी यांनी दिले. त्याचे राजकारण कोणी करू नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. त्यांनी रत्नागिरी येथून झुम अॅपद्वारे पत्रकारांशी संवाद साधला.मंत्री सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात चाकरमानी गेल्या काही दिवसांत येत आहेत. ई-पास दिले गेले आहेत. तरीही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून दिला जात आहे तो चुकीचा आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ई-पास घेऊन लोक येत आहेत. त्यामुळे त्यांच्या येण्याला आम्ही विरोध केलेला नाही. त्यामुळे गैरसमज पसरविणाऱ्यांपासून सावध असावे, असे सामंत म्हणाले.या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय, हॉटेल व अन्य ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन केले जात आहे, असे उदय सामंत म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॅबवरून राजकारण सुरू झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी यंत्रणा आली आहे. पण वापर करून घेतला नाही, अशी टीका सुरू आहे. ते योग्य नाही. कोरोना पार्श्वभूमीवर यंत्रणा आली नाही, असे ते म्हणाले.माकडताप तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी माकड तापाचे रुग्ण तपासणीसाठी आणलेली मशीन आहे. केंद्र स्थापन झाल्यानंतर ती मशीन वापरात येईल.सरसकट ई-पास दिला जात आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण येत आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूरच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पास देणाऱ्या यंत्रणेला पत्र दिले आहे.
पास टप्प्याटप्प्याने दिले जावेत, असे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या गाईडलाईनचे पालन करून सर्वांना क्वारंटाईन करता येईल, अशी भूमिका जिल्हाधिकारी यांची आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या या पत्राचे भांडवल करून विरोधक गैरसमज पसरवित आहेत, असेही उदय सामंत यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विरोधी पक्षांच्या जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत चर्चा झाल्यावर तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, खासदार नारायण राणे आणि गोवा मुख्यमंत्री यांच्याशी मी बोललो आहे. त्यामुळे गैरसमज पसरविण्याचे कोणी सोयीस्कर राजकारण करू नये, असे सामंत म्हणाले.देवगडमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मशिनरी आली नाही. तर सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून डायलेसिस सेंटरसाठी यंत्रसामग्री आलेली आहे, हे लक्षात घ्यायला हवे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या अध्यक्षतेखाली समितीने होमिओपॅथिक गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व जनतेपर्यंत गोळ्या पोहचविण्यासाठी निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.रत्नागिरी जिल्ह्यात चार लाख ३० हजार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ लाख आयुष्य मंत्रालयातील गोळ्या पुढील तीन महिन्यांसाठी कोविड- १९ फंडातून प्रत्येकाच्या घरात पोहोचतील यासाठी प्रयत्न राहील.माझ्यावर होणाऱ्या टीकेपेक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी आणि दक्षता घेण्यावर मी आणि प्रशासन देखील प्रयत्न करीत आहे, असे सामंत म्हणाले. त्यामुळे गैरवाजवी टीकेवर विचलित होण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले.नारायण राणे यांच्या हॉस्पिटलमध्ये स्वॅब तपासणी निर्णयात मी खोडा घातलेला नाही. उलट त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून चर्चा केली. त्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे योग्य त्या पूर्तता करून स्वॅब तपासणी लॅब सुरू करावी, असे उदय सामंत म्हणाले.जनतेसाठी सर्वांनी लढ्यात सहभागी झाले पाहिजेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टर, नर्स पोलीस, महसूल यंत्रणाही योग्य पद्धतीने काम करीत आहे. उलट या यंत्रणेला सर्व श्रेय द्यावे लागेल. ते मी देतो, असे सामंत यांनी सांगून मी श्रेय घेत असल्याची होणारी टीका तथ्यहीन आहे, असेही सामंत यांनी सांगितले. सर्वांनी श्रेयासाठी नव्हे तर जनतेसाठी कोरोनाच्या विरोधातील लढ्यात सहभागी झाले पाहिजे, असे ते म्हणाले.