सावंतवाडी : परप्रांतीय कामगारांची घुसमट झाली आहे. गोवा राज्यात अडकलेल्या कामगारांनी चोरट्या मार्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. तसेच येथील मिळून ८३ कामगार एका ट्रकमधून जात असताना कुडाळ तालुक्यातील झाराप महामार्ग येथे त्यांना ताब्यात घेण्यात आले.परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकसह ८३ कामगारांना सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने महसूल विभागाचे दंडाधिकारी तथा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी ताब्यात घेतले. यातील बहुतांश कामगार हे मध्यप्रदेश आणि बिहार राज्यातील आहेत.
मात्र या मजुरांना सोमवारी मध्यप्रदेशला कुडाळवरून सुटणाऱ्या श्रमिक एक्स्प्रेसमधून पाठविण्यात येणार आहे तर बिहारमध्ये जाणाऱ्या मजुरांना त्या राज्याने जादा एक्स्प्रेस न सोडल्याने जाता येणार नसल्याचे तहसीलदार म्हात्रे यांनी त्यांना माघारी पाठविले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अडकलेले परप्रांतीय अनेक मार्गाने आपल्या मूळ गावी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुरुवारी सकाळी झाराप-पत्रादेवी चौपदरी महामार्गावर धुळे पासिंगचा सिमेंट घेऊन आलेला ट्रक परतीच्या मार्गाला उत्तर प्रदेशकडे जात असताना या ट्रकमध्ये ८३ मजूर आढळले. त्यांना ताब्यात घेतले.सावंतवाडी पोलीस स्थानकात आणण्यात आल्यानंतर त्या मजुरांना सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर नेण्यात आले. यावेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक खोत व तहसीलदार म्हात्रे यांनी चौकशी केली असता हे सर्व कामगार आपल्या गावी मध्यप्रदेश, बिहारकडे जात होते.