संतोष पाटणकर खारेपाटण : सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याची सीमा म्हणून ओळखला जाणारी खारेपाटण शुकनदीवरील सिंधुदुर्ग जिल्हा तपासणी नाका ठरतोय डोकेदुखी अशा आशयाचे वृत्त गुरुवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. याची तातडीने दखल घेत कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी नीतीन कटेकर यांनी गुरुवारी सायंकाळी ५ वाजता तातडीनष खारेपाटण तपासणी नाका येथे भेट दिली. व तेथील सद्य परिस्थिती जाणून घेतली.यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, ग्रामविकास अधिकारी जी. सी. वेंगुर्लेकर, तलाठी रमाकांत डगरे, पोलीस पाटील दिगंबर भालेकर, ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर, खारेपाटण पोलीस कॉन्स्टेबल रावराणे, उद्धव साबळे आदी उपस्थित होते.खारेपाटण येथील जिल्हा तपासणी नाक्यामुळे खारेपाटण, संभाजीनगर, टाकेवाडी व काझीवाडी येथील ग्रामस्थांची खारेपाटणमध्ये येण्यास अडचण येत होती.
पोलीस प्रशासन सहकार्य करीत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. मात्र, सध्याची कोरोना विषाणूची लागण लक्षात घेता तसेच त्याचा वाढता प्रादुर्भाव पाहता खारेपाटण तपासणी नाका येथील पोलीस पहारा अधिक कडक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी सांगितले.
संपूर्ण खारेपाटण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. व जीवनावश्यक वस्तूच्या दुकान खरेदीखेरीज कोणी व्यापारी वर्गाने दुकाने उघडल्यास त्यांच्यावर स्थानिक ग्रामपंचायतीच्यावतीने व पोलीस सहकार्याने कारवाई करण्यात यावी असे सक्त निर्देश खारेपाटण ग्रामसंनियंत्रण समितीला दिले.यावेळी सरपंच रमाकांत राऊत यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्याशी चर्चा केली व खारेपाटण काझीवाडी, संभाजीनगर, टाकेवाडी येथील ग्रामस्थांना खारेपाटण येथे येण्यास अडवू नये असे सांगितले. खारेपाटण संभाजीनगर, टाकेवाडी, काझीवाडी येथील नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्यात. जिल्हा सीमा तपासणी नाक्याबाहेर हे रहिवासी राहत असल्यामुळे त्यांच्या समवेत रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबईतील नागरिक जिल्हा सीमा पार करून हद्दीत येण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाने याची काळजी घेणे गरजेचे असल्याच्या सूचना डॉ. कटेकर यांनी दिल्या.घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावेसध्या कोरोनाचा संपूर्ण देशात वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे तसेच सर्वत्र लॉकडाऊन परिस्थिती असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा सीमेवरील पोलीस पहारा हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असून खारेपाटण, संभाजीनगर, काझीवाडी व टाकेवाडी येथील ग्रामस्थांना आमचे पोलीस खारेपाटण बाजारपेठेत येण्यापासून रोखणार नाहीत. मात्र, त्यांच्याकडे स्वत:चे आधारकार्ड, ओळखीचा पुरावा म्हणून असणे गरजेचे आहे.विनाकारण फिरणाऱ्यांवर मात्र कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी शक्यतो घरातच राहून पोलीस प्रशासन व शासनास सहकार्य करावे, असे आवाहन कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी केले आहे.