खारेपाटण : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरदिवशी हजारोंच्या संख्येने मुंबईकर चाकरमानी दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर व्यापारी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने १८ ते २५ मेपर्यंत आठ दिवसांच्या कालावधीकरिता खारेपाटण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय येथील व्यापारी असोसिएशनच्यावतीने घेण्यात आला आहे.खारेपाटण ग्रामसनियंत्रण समितीच्यावतीने वारंंवार येथील व्यापारीवर्गाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात शासन निर्णयानुसार फक्त जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असे सांगितले होते. मात्र, खारेपाटण बाजारपेठेत सर्रास सरसकट सर्वच दुकाने नेहमी उघडी ठेवण्यात येत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
परिणामी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दीही दिवसेंदिवस वाढत जाऊ लागली आहे. याशिवाय नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याने त्याचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनचा पुढील टप्पा सुरू झाला असल्याने पुढील काळात सरकार आणखी काही दिवस नियम व अटी राज्यात लागू करण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन काळात अडकलेले विद्यार्थी, भाविक, पर्यटक, परप्रांतीय मजूर, मुंबईकर चाकरमानी सध्या आपल्या मूळगावी मोठ्या संख्येने येत आहेत.खारेपाटण येथील सिंधुदुर्ग जिल्हा सीमा तपासणी नाक्यावर गेले सात दिवस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.यावर प्रशासनाने तातडीने हालचाल केली व सर्व गर्दी नियंत्रणात आणली. याकरिता ५ महसूली पथकांबरोबर पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी दिवसरात्र ३ शिफ्टमध्ये काम करीत आहेत. रविवारच्या दिवशी मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी फारच कमी होती.याकरिता खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोळ, कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, कणकवली तहसीलदार आर. जे. पवार, कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. बर्वे, तपासणी नाका नोंदणी कक्ष पथकप्रमुख प्रदीप श्रावणकर यांनी रात्रभर मेहनत घेत वाढलेली गर्दी कमी करून ती नियंत्रणात आणली. नागरिकांना लवकरात लवकर घरी सोडण्यासाठी प्रयत्न केले.घरपोच धान्य, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारसिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबईकर चाकरमान्यांचे येणारे लोंढे पाहता पोलीस, आरोग्य, महसूल यंत्रणेची सिंधुदुर्ग जिल्हा सीमा खारेपाटण तपासणी नाका येथे तारांबळ उडाली आहे. खारेपाटण बाजारपेठेत ही गर्दी येण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे येथील कर्मचारी वर्गावर खारेपाटण बाजारपेठेचा आणखी अतिरिक्त ताण पडू नये म्हणून आणि आरोग्याच्या व व्यवस्थेच्या दृष्टीने खारेपाटण बाजारपेठ पुढील आठ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्यावतीने घेण्यात आला आहे.अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू वगळून बाजारपेठ बंद राहील. बंद काळात खारेपाटण पंचक्रोशीतील आजूबाजूच्या सर्व गावांना घरपोच धान्य पुरवठा तसेच जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जातील. याकरिता नागरिकांनी व सर्व व्यापारी बांधवांनी तसेच ग्राहकांनी आम्हांला सहकार्य करावे, असे आवाहन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर कुबल यांनी केले आहे.