तळेरे : आता काम करताना सर्व नाभिक बांधवांनी स्वत:च्या जीवाची काळजी घेऊनच काम करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी केले आहे.
लॉकडाऊन शिथिल असलेल्या काळात आपल्या नाभिक व्यावसायिकांना प्रशासनाने काम करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे २२ मेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त नाभिक व्यावसायिक उमेदीने काम करायला सज्ज झालेला आहे.
गेले ६० दिवस घरात बसून असलेला नाभिक सलून उघडण्याची आतुरतेने वाट पहात होता. आता त्याची प्रतीक्षा संपली आहे.सर्व सलूनधारकांनी, कारागिरांनी संघटनेने दिलेल्या स्वच्छताविषयक नियमावलीचे पालन करावे. सॅनिटायझरचा वापर करावा. एकावेळी एकाच ग्राहकाला दुकानात प्रवेश द्यावा. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सेवा द्यावी. कोणीही कितीही आग्रह केला तरीही नियमांना अधीन राहूनच सेवा द्यावी. संघटनेने ठरवून दिलेल्या नियमांचेही पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.