जनीकांत कदम कुडाळ : लॉकडाऊनमुळे विमानसेवा बंद असल्याने चिपी विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या काही मशिनरी युरोपीय देशातून आणता येणार नसल्याने चिपी विमानतळाचे काम पुन्हा एकदा रखडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा परिणाम चिपी विमानतळावरदेखील दिसून आला आहे. त्यामुळे चिपीवरून विमानाचे टेक आॅफ सध्या दूरच आहे.सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून या जिल्ह्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या चिपी विमानतळाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
हा विमानतळ १ मे रोजी सुरू करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. त्यादृष्टीने प्रशासनानेही काम सुरू केले होते. मात्र, हा विमानतळ सुरू होण्यासाठी याठिकाणी आवश्यक असणारे पाणी, विद्युत सोयी सुविधा तसेच इतर काही मशिनरी व त्यानंतर विमानतळ सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी या सर्व प्रलंबित गोष्टी कशा पूर्ण होतील.
यासाठी आयआरबी कंपनी व प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत होते. खासदार विनायक राऊत यांनीही याकरिता पाठपुरावा सुरू केला होता. त्यामुळे १ मे रोजी हा विमानतळ सुरू होईल अशा आशा पल्लवित झाल्या होत्या.दरम्यान, जगभर थैमान घातलेल्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता बहुतांशी देशात संचारबंदी करण्यात आली आहे. तसेच विमान, रेल्वे व इतर वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे याचा परिणाम सर्व क्षेत्रांवर दिसून येत आहे.आवश्यक असलेल्या मशिनरी बाहेरच्या देशातून चिपी विमानतळ येथे येऊ शकत नसल्यामुळे विमानतळ आता केव्हा सुरू होईल याबाबत सध्यातरी अनिश्चितता आहे. चिपी विमानतळ प्रकल्प १ मे पासून सुरू होईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आले असताना केली होती. मात्र, मार्च महिन्यापासूनच संपूर्ण भारतात लॉकडाऊन झाल्यामुळे सर्वच प्रकल्प बंद पडले. त्यामुळे यावर्षी तरी चिपी विमानतळ प्रकल्प सुरू होण्याची आशा धुसर झाली आहे.
आता पावसाळा आहे. त्यामुळे चार महिने चिपी विमानतळाचे उर्वरित काम बंद राहणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा मोठा फटका चिपी विमानतळ प्रकल्पाला बसला आहे.मशिनरी सध्यातरी येणार नाहीतसंचारबंदी असल्यामुळे युरोपीय देशातून विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या मशिनरी आता आणणे सध्यातरी शक्य होणार नाही. यामध्ये एक्स-रे मशीन, स्कॅनर, सिक्युरिटी सिस्टीम तसेच इतर काही मशिनरींचा समावेश आहे.या मशिनरी युरोपीय देशातून आणण्यात येणार होत्या. मात्र, लॉकडाऊनमुळे विमानसेवा बंद असल्यामुळे या मशिनरी सध्यातरी चिपी विमानतळ येथे आणता येणार नाही. त्यामुळे चिपी विमानतळाचे उर्वरित काम मात्र रखडले आहे.