ओरोस : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत असताना शासनाला आर्थिक कमतरता भासू नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक, अधिकारी-कर्मचारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी ५८ लाख ९ हजार ६०० रुपयांचा निधी कोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला आहे.
याचा धनादेश पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. हा निधी देऊन सहकार क्षेत्र सरकारच्या मागे असल्याचे दाखविण्याची किमया जिल्हा बँकेने केली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्र्यांनी काढले.सिंधुदुर्ग जिल्हा बँक, बँकेचे अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील सहकारी संस्था यांच्या सहकार्याने ह्यकोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीह्ण मदत धनादेश सुपुर्द कार्यक्रम जिल्हा बँकेच्या सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, गुलाबराव चव्हाण, प्रज्ञा परब आदी उपस्थित होते.संपूर्ण देशात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे. तसेच शासनाने या विषाणूविरोधात लढा देण्यासाठी आवश्यक ते उपाय करण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी कोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधी जमा करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. त्यानुसार राज्यात विविध संस्था, राजकीय व्यक्ती, लहान मुलेदेखील आर्थिक मदत करीत आहेत.त्याचप्रमाणे कोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करण्याचा निर्णय जिल्हा बँक आणि सहकारी संस्थांनी घेत तब्बल ५८ लाख ९ हजार ६०० रुपयांचा निधी जमा केला आहे.यात सिंधुदुर्ग जिल्हा बँक २५ लाख रुपये, सिंधुदुर्ग बँक अधिकारी व कर्मचारी ७ लाख २ हजार रुपये तर सहकारी संस्था १३ लाख २७ हजार ६०० रुपये तर विविध संस्थांकडे एनइएफटीच्या माध्यमातून जमा झालेल्या १२ लाख ८० हजार रुपयांचा समावेश आहे. सोमवारी विविध संस्थांकडील मदतनिधीचे धनादेश पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
यावेळी उदय सामंत म्हणाले, कोरोनापासून मुक्तता होण्यासाठी सर्वांनी संयम आणि शासनाच्या सूचनांचे पालन करावे. यावेळी जिल्हा बँकेचे नाव हे राज्यातील आदर्शवत बँकांमध्ये येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या बँकेने सहकार क्षेत्र हे सरकारच्या पाठीशी आहे हे ५८ लाखांची मदत करून दाखवून दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करणारशासनाच्या आयुष संस्थेमार्फत रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथिक गोळ्या दिल्या जाणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील साडेसात लाख कुटुंबातील २५ लाख लोकांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत.
तीन दिवसांचा गोळ्यांचा डोस असून ३ कोटी गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात या गोळ्या शासनामार्फत मोफत दिल्या जाणार असून मोफत गोळ्या वाटप करणारे हे राज्यातील पहिले जिल्हे असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरासिंधुदुर्ग जिल्हा बँक सभागृहात कोविड १९ मुख्यमंत्री सहाय्यता निधी मदत धनादेश सुपुर्द कार्यक्रम पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित होत्या. मात्र या कार्यक्रमास सेना पदाधिकारी यांच्यासह सहकारी बँक संचालक व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेथे गर्दी एवढी होती की सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचे दिसून आले.