कणकवली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अडकलेले विद्यार्थी , मजूर , कामगार यांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सोडण्यासाठी व परराज्यातून येऊ इच्छिणाऱ्यांना आपल्या राज्यातील नागरिकांना सीमेवरून आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून मोफत सेवा देण्यात येणार आहे .
याशिवाय इतरांसाठी महामंडळाने जाहिर केल्यानुसार ४४ रुपये प्रति कि . मी . प्रमाणे प्रवास भाडे भरल्यावर गाड्या उपलब्ध होणार असल्याची माहिती एसटीचेसिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली .लॉकडाऊनमुळे परराज्यातील अनेक मजूर कामगार विद्यार्थी आपल्याकडे अडकलेले आहेत . त्यांच्याकडून सक्षम प्राधिकाऱ्याकडील परवानगी व वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून परराज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात येणार आहे . मात्र, महाराष्ट्राचे रहिवाशी असलेले अनेकजण परराज्यात अंतर्गत भागात अडकून पडले आहेत . त्यांनाही प्रशासनाच्या परवानगीनंतर सीमेवरून आणून सोडण्यासाठी एस . टी . महामंडळ सज्ज आहे .हा प्रवास मोफत असणार आहे . यासाठी लागतील तेवढ्या गाड्या राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत . प्रशासकीय पातळीवरील मंजूरीनंतरच या गाड्या सोडण्यात येणार असल्याचे रसाळ यांनी सांगितले .याशिवाय दुसऱ्या जिल्हयात वा अन्य ठिकाणी ज्यांना जावयाचे आहे , त्यांना महामंडळाने यापुर्वी जाहिर केलेल्या धोरणानुसार ४४ रुपये प्रति कि .मी .जाण्या येण्याची रक्कम व आवश्यक मंजुरी प्राप्त झाल्यानंतर गाड्या सोडण्यात येणार आहेत.प्रवाशांनी या सेवांचा लाभ घ्यावा . तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार जेवढ्या बसेसची गरज लागेल तेवढ्या राज्य परिवहन महामंडळाचा सिंधुदुर्ग विभाग तैनात ठेवणार असल्याचेही रसाळ यांनी सांगितले . यावेळी विभागिय कर्मचारीवर्ग अधिकारी एल . आर . गोसावी उपस्थित होते .