कुडाळ : आठवडा बाजाराच्या दिवशी कुडाळ बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षितेच्या दृष्टीने कुडाळ बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. यामुळे कुडाळ बाजारपेठेत तसेच शहरात शुकशुकाट दिसून येत होता.संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सर्व दुकाने बंद असतानाही कुडाळ बाजारपेठेत प्रत्येक बुधवारी आठवडा बाजाराच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता व आता संचारबंदीतील शिथिलता पाहता बुधवारी आठवडा बाजाराच्या दिवशी गर्दीचे प्रमाण हे दुप्पट होण्याची शक्यता वर्तविली जात होती.
त्यामुळे मंगळवारी प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी व्यापाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत बुधवारी आठवडा बाजार सुरू राहिल्यास मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू शकते व त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. त्यामुळे बुधवारी आठवडा बाजार हा बंद ठेवावा अशी चर्चा झाली होती.
बुधवारी आठवडा बाजाराच्या दिवशी सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून हा बंद सर्वांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने हा बंद पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवावी असे आवाहन नगराध्यक्ष ओंकार तेली यांनीही मंगळवारी केले होते. बुधवारी मेडिकल व काही अत्यावश्यक सोयी सुविधांची दुकाने सुरू होती.