वैभववाडी : तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात खोल्याच शिल्लक नसल्यामुळे बुधवारी सायंकाळी उशिरा वैभववाडीत दाखल झालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. त्यांना तब्बल अडीच तास तहसील कार्यालयासमोर ताटकळत रहावे लागले. त्यामुळे संतप्त चाकरमान्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.मुंबईतून दोन खासगी वाहनातून मौदे आणि मांगवली गावातील १७ लोक सायंकाळी वैभववाडीत दाखल झाले. ते सर्व लोक संस्थात्मक क्वारंटाईन करून घेण्यासाठी सांगुळवाडी येथे गेले. परंतु, तेथील अधिकाऱ्यांनी येथे खोल्याच शिल्लक नसल्याचे सांगत त्यांना तहसील कार्यालयात पाठवले. त्यामुळे ते सर्व लोक पाच वाजता तहसील कार्यालयासमोर आले.
या लोकांना ठेवण्यासाठी खोल्याच नसल्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला. लहान मुलांसह हे सर्व लोक तब्बल अडीच तास तहसील कार्यालयासमोर उभे होते. परंतु, त्यांची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे आलेले सर्व लोक नाराज झाले.स्वत:हून संस्थात्मक क्वारंटाईन होण्यासाठी आम्ही आलो. परंतु, प्रशासनाकडून कोणतेच सहकार्य मिळत नाही. पहाटे तीन वाजता आम्ही घरातून निघालो आहोत. आता दिवसभर जेवलेलोसुध्दा नाही. लहान मुले उपाशी आहेत, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान, सायंकाळी उशिरा सांगुळवाडी येथील आधीच्या काही लोकांना अन्यत्र स्थलांतरित करून तेथील सहा खोल्या या लोकांना देण्यात येत असल्याचे सांगितले.परंतु, इतका त्रास का देता? आम्ही तेथे जाऊन आलो. त्याचवेळी आम्हाला तेथे थांबवायचे होते, अशी भूमिका घेत त्यांनी जाण्यास नकार दिला. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालून या चाकरमान्यांना सांगुळवाडीतील क्वारंटाईन केंद्रात नेण्यात आले.
विलंब होतोय; पण नियोजन सुरू आहेसांगुळवाडी येथे आलेल्या लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. लोक जास्त प्रमाणात येत असल्यामुळे त्यांची व्यवस्था करायला थोडासा विलंब लागतो. परंतु, आणखी काही इमारतींची व्यवस्था आम्ही करीत आहोत. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. याशिवाय मंगळवारी बैठक घेऊन गावातील सनियंत्रण समित्यांनासुध्दा आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत.- रामदास झळके,वैभववाडी तहसीलदार