रजनीकांत कदम कुडाळ : रुग्णसेवेचा ध्यास घेऊन बी. एस्सी. नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय कुडाळच्या युक्ता मिसाळ व प्राजक्ता ओरोसकर या दोन्ही विद्यार्थिनी ३० मार्चपासून आजतागायत सातत्याने ओरोस येथे विलगीकरणात असलेल्या व्यक्तींना जेवण पोहोचविण्याचे काम अविरतपणे करीत आहेत. त्यांचे हे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी व आदर्शवत असेच आहे.संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूचे तांडव सुरू आहे. या संकटामुळे सर्व मानवजात त्रस्त झाली असताना आपत्कालीन व्यवस्थापनात कार्यरत असलेले डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, सफाई कामगार व इतर स्वयंसेवी संस्था हे अहोरात्र परिश्रम घेत आहेत. डॉक्टर, परिचारिका अखंड रुग्णसेवा करीत आहेत.
एखाद्या पदावर कार्यरत असताना त्या पदाला न्याय देणे यामागे कर्तव्यपूर्ती हा दृष्टीकोन असतो. परंतु विद्यार्थीदशेत शिकत असताना अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये सहभाग घेऊन रुग्ण सेवा देणे यासाठी सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलता आवश्यक असते.असे सामाजिक भान बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयात बी. एस्सी. नर्सिंगचे शिक्षण घेत असणाऱ्या युक्ता लक्ष्मण मिसाळ व प्राजक्ता दीनानाथ ओरोसकर या दोन्ही विद्यार्थिनींनी दाखवून दिले आहे. ३० मार्चपासून आजतागायत त्या दोन्हीही सातत्याने ओरोस येथे विलगीकरणात असलेल्या व्यक्तींना जे जेवण येते ते त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत. या दोन्ही विद्यार्थिनी ओरोस गावच्या रहिवासी आहेत.आज कोविड-१९ या आजाराविषयी समाजामध्ये जागरुकता होताना दिसते. परंतु एक महिन्यापूर्वी कोरोनाबाबत लोकांमध्ये प्रचंड भीती होती. कोरोनाविषयी त्यांना माहिती नव्हती. त्यामुळे विलगीकरणात असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येण्यास लोक धजत नसत. अशा प्रतिकूल परिस्थितीत या विद्यार्थिनींनी केलेले कार्य उल्लेखनीय व सर्व विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत आहे.५० टक्के शैक्षणिक फी केली माफया दोन्हीही विद्यार्थिनींनी दाखविलेल्या कर्तव्य पालनाचे, धाडसाचे कौतुक करण्यासाठी व त्यांना उत्तेजन देण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने त्यांच्या शैक्षणिक वर्षाची ५० टक्के शैक्षणिक फी माफ केली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी दिली.गाळवणकर यांच्याबरोबरच बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मीना जोशी व उपप्राचार्या संकल्पना भंडारी तसेच सर्व प्राध्यापक यांचे या विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन लाभले. या त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे समाजातील सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.उमेश गाळवणकर यांचे प्रोत्साहनअशाप्रकारचा विचार मनात निर्माण होण्यासाठी किंवा असे धाडस करण्यासाठी जे खंबीर पाठबळ लागते ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी त्यांना दिले. गाळवणकर हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये हिरीरीने सहभागी होतात. त्यांच्या प्रबळ पाठबळामुळे अशाप्रकारचे सत्कार्य या दोन्ही विद्यार्थिनींच्या हातून घडत आहे.