कुडाळ : कुडाळ तालुक्यातील साळगाव खालची धुरीवाडी येथे आढळलेली कोरोना पॉझिटिव्ह विवाहिता व तिचे कुटुंबीय वाडीतील अनेकांच्या संपर्कात आल्याने साळगाव गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साळगाव सरपंच उमेश धुरी यांनी या वाडीच्या ५०० मीटर परिघातील ग्रामस्थांना घराच्या बाहेर पडू नका, अशी विनंती केली आहे तसेच त्यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेधही केला आहे.साळगाव गावामध्ये मुंबईवरून आलेली विवाहिाा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. हे कुटुंबीय १५ मे रोजी मुंबईवरून साळगावात आले होते. मिनीबसच्या माध्यमातून आलेले हे कुटुंबीय हे १५ मेपासून साळगाव प्राथमिक शाळा नंबर ४ मध्ये संस्थात्मक क्वारंटाईन होते.दरम्यान, या कुटुंबीयांसोबत कणकवली येथील आलेली व्यक्ती २ जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर या सर्व कुटुंबीयांची स्वॅब चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यांचे अहवाल आले नव्हते. दरम्यान, त्यांचे १४ दिवसांचे संस्थात्मक क्वारंटाईन झाल्यावर त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र, होम क्वारंटाईन न राहता वाडीतील अनेकांच्या संपर्कात हे कुटुंबीय आले. त्यांचे स्वॅब चाचणी अहवाल ५ जून रोजी प्राप्त झाले. यात एक विवाहिता पॉझिटिव्ह आढळून आली आहे. मात्र, ती विवाहिता व त्यांचे कुटुंबीय गेल्या आठ दिवसांपासून अनेकांच्या संपर्कात आले होते. ते अनेकांच्या संपर्कात आल्यामुळे गावामध्ये घबराट निर्माण झाली आहे.याबाबत माहिती मिळताच साळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश धुरी यांनी आपल्या ग्राम कमिटी, ग्रामपंचायत सदस्यांसह या वाडीच्या ५०० मीटर परिघातील ग्रामस्थांच्या घरी जाऊन घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे. मात्र, या घटनेकडे शासनाने दुर्लक्ष केला असल्याचे दिसून येत आहे.प्रशासन ढिम्म, गावांना फटकायाबाबत सरपंच उमेश धुरी यांनी सांगितले की प्रशासन जे १४ दिवसांचे क्वारंटाईन करीत आहे ते चुकीचे आहे. २२ दिवसाचे क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. प्रशासन ढिम्म झाले आहे. या कुटुंबासोबत असलेली कणकवलीची व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यानंतर यांचे घेतलेले स्वॅब आणि त्यांचे प्राप्त झालेले अहवाल याचा कालावधी हा मोठा आहे. या कालावधीत हे कुटुंबीय अनेकांच्या संपर्कात आले आहे.
पालकमंत्र्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका गावांना बसत आहे. या गावातील ग्रामस्थांनी काय चूक केली होती? असा सवाल उपस्थित करून प्रशासनाच्या या कारभाराचा त्यांनी निषेध केला आहे.