सिंधुदुर्ग/मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे अनेक जण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. तसेच नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या चाकरमान्यांचेही लॉकडाऊनमुळे हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला गावी जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मुंबईत असलेल्या चाकरमान्यांकडून वारंवार केली जात आहे. दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातील गावी पाठवण्याच्या निर्णयाबाबत मोठे विधान केले आहे.
सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर चाकरमान्यांना गावी आणू, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सामंत म्हणाले की, 'लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या कोकणातील चाकरमान्यांना गावी परत आणण्याबाबत आमच्या मनात दुमत नाही. चाकरमानी आपल्या गावी येऊन सुरक्षित राहावेत अशीच आमची इच्छा आहे. पण असे असले तरी राज्य सरकारला केंद्राच्या नियमावलीनुसार काम करावे लागत आहे. त्यामुळे याबाबत केंद्र आणि राज्य सरकारचा सकारात्मक निर्णय झाल्यावर पालकमंत्री म्हणून मी स्वतः पुढाकार घेऊन चाकरमान्यांना गावी आणेन.'
दरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो चाकरमानी लॉकडाऊनमुळे मुंबई आणि उपनगरात अडकून पडले आहेत. तसेच त्यापैकी अनेकजण छोट्या खोल्यांमध्ये राहत असल्याने त्यांचे हाल होत आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झालेला नाही. तसेच येथे सापडलेले कोरोनाबाधित रुग्णही आता बरे होत आहेत.