सिंधुदुर्ग - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे सध्या राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र तरीही राज्यातील काही जिल्हे कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित होते. मात्र कोरोनाचे रेड झोन बनलेल्या मुंबई, पुणे आदी भागातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या स्थलांतरामुळे या जिल्ह्यांमध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. कोकणातील रत्नागिरीपाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोनाने गंभीर रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी जिल्ह्यात एकूण २४ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४८ वर पोहोचली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनची सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक अंमलबजावणी सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मर्यादित होती. मात्र मे महिन्यात प्रवासावरील निर्बंध शिथिल होऊन मुंबई-पुण्यावरून येणाऱ्यांची वर्दळ वाढल्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे.
गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २४ होती. मात्र शुक्रवारी एकाच दिवशी जिल्ह्यात सुमारे २४ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४८ झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, वैभववाडी, देवगड आदी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडले. तसेच देवगडमध्ये काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सध्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४८ झाली असून, ७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एक व्यक्ती उपचारांसाठी जिल्ह्याबाहेर गेली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचे ३९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...
शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध
गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी