वेंगुर्ला : कोरोना संदर्भात जागतिक आरोग्य संघटना तसेच आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि विविध देशातील होमिओपॅथी तज्ज्ञांनी दिलेल्या औषधांचा अभ्यास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठी कार्य करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला येथील सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीराम हिर्लेकर यांनी जिल्ह्यातील नामवंत होमिओपॅथी तज्ज्ञांचा अभ्यासगट स्थापन केला आहे.
आॅनलाईन चर्चेद्वारे आणि विविध तज्ज्ञांची मते विचारात घेऊन या अभ्यासगटाने काही होमिओपॅथीक औषधांचा अभ्यास केला आहे. त्यानुसार २५ औषधे निवडली असून त्याद्वारे प्रतिकारशक्ती वाढून कोरोनाला आळा बसेल असा दावा या टीमने केला आहे.होमिओपॅथी ही समलक्षण चिकित्सा पद्धती असून तिचा मुख्य उद्देश आजाराविरुद्ध लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणे हा आहे. अनेक व्यक्तींना एकच आजार झाला असेल तरी त्यांची लक्षणे व्यक्तीनुसार थोडीफार वेगळी असू शकतात. त्यामुळे कोरोनावर एकच औषध सर्वांसाठी नसून त्या व्यक्तीच्या लक्षणांनुसार औषध देता येईल. भारतातील विशेषत: मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या लक्षणांचा बारकाईने अभ्यास करून उपयुक्त ठरतील अशी सुमारे २५ औषधे या टीमने निवडली आहेत.कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्याची संधी मिळाल्यास योग्य ती औषधे देता येऊ शकतील. आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम ३० हे औषध रोगप्रतिबंधक असल्याचे सांगितले आहे. होमिओपॅथी केंद्रीय संशोधन परिषदेने सादर केलेल्या अहवालानुसार भारतात विलगीकरण केलेल्या सुमारे ३ हजारांहून अधिक लोकांना काही दिवस अर्सेनिकचे डोस दिल्यानंतर ९९ टक्के व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे सिंधुदुर्गात कोरोनाबाधित रुग्ण किंवा विलगीकरण कक्षात ठेवलेल्या व्यक्तींना त्यांच्या आणि सरकारच्या संमतीने होमिओपॅथी उपचार देण्याचा आपला मानस असल्याचे या अभ्यास गटाने सांगितले आहे. या अभ्यास गटामध्ये डॉ. निलेश पेंडुरकर, डॉ. मंदार नानल (कणकवली), डॉ. प्रशांत सामंत (कुडाळ), डॉ. स्नेहल गोवेकर, डॉ. रेवती लेले (सावंतवाडी), डॉ. एस. एम. कुंभार (आरोंदा) आदींचा समावेश आहे.आरोग्य सेतू अॅप प्रत्येकाने डाऊनलोड करावेइतर कोणत्याही व्यक्तीला रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे औषध हवे असेल त्याने जवळच्या होमिओपॅथी डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली औषध घ्यावे.होमिओपॅथीमध्ये कोरोनावर कोणतेही ब्रॅण्डेड औषध उपलब्ध नाही. कुणीही फसव्या जाहिरातींना बळी पडू नये.ज्या व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी किंवा यकृताचे आजार असतील अशा आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच आरोग्य सेतू हे अॅप प्रत्येकाने डाऊनलोड करून घ्यावे. तुम्ही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तर लगेच सूचना मिळण्यासाठी आरोग्य सेतू अॅप प्रत्येकाने डाऊनलोड करण्याचे आवाहनही या अभ्यासगटाने केले आहे.