कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जास्त कोविड रुग्ण कणकवली तालुक्यातील शहर व शहरालगतच्या परिसरात आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग आणखीन वाढू नये यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून कणकवली बाजारपेठ २५ ते ३० जून या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय कणकवली नगरपंचायत नगरसेवक व कणकवली तालुका व्यापारी संघ यांनी समजुतीने घेतला आहे, अशी माहिती विशाल कामत यांनी दिली.कणकवली नगरवाचनालयाच्या सभागृहात बुधवारी सायंकाळी ६ वाजता नगराध्यक्ष समीर नलावडे, व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत, सचिव विलास कोरगावकर, दीपक बेलवलकर, अशोक करंबेळकर, राजू गवाणकर, राजू पारकर, निवृत्ती धडाम, संतोष काकडे, सुजित जाधव, नगरसेवक बंडू हर्णे, सुरबा गावकर, आनंद पोरे, नाभिक संघटना जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर व व्यापारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली.यावेळी कणकवली शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत चर्चा झाली. तसेच चर्चेअंती ३० जूनपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी तसेच संध्याकाळी दोन तास दूध विक्रीसाठी संबंधित विक्रेते आपली दुकाने उघडी ठेवू शकतात, असेही यावेळी ठरविण्यात आले.दरम्यान, या बैठकीपूर्वी तहसीलदार रमेश पवार, नगराध्यक्ष समीर नलावडे, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांच्या उपस्थितीत कणकवली तहसीलदार दालनात बैठक आयोजित केली होती. कोविड समूह संक्रमणाचा धोका निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर ३० जूनपर्यंत कणकवली शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी भूमिका व्यापारी, आम्ही कणकवलीकर आणि अन्य व्यापाऱ्यांच्यावतीने अशोक करंबेळकर यांनी मांडली होती. यावेळी बाजारपेठ उत्स्फूर्त बंद ठेवण्याचा निर्णय सर्व व्यापाऱ्यांनी मिळून घ्यावा, असे तहसीलदार रमेश पवार यांनी स्पष्ट केले होते.