मालवण : मालवण शहरवासीयांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्यामुळे आजपर्यंत मालवण शहर कोरोनामुक्त ठेवण्यात यश आले. यापुढेही मालवण शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी अधिक खबरदारी घेत स्वत:ची आचारसंहिता प्रत्येकाने अमलात आणावी.
स्वयंशिस्तीचा एक वेगळा आदर्श मालवण शहरवासीयांनी जिल्ह्यासमोर ठेवूया, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी जनतेला केले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा सरसकट लॉकडाऊन केल्याने संकटात असलेला व्यापारीवर्ग संतप्त बनला आहे.बाधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी अटी शर्तींसह जी शिथिलता होती ती मिळावी. सरसकट लॉकडाऊन नको ही व्यापारी बांधवांची भूमिका त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. व्यापारीवर्ग खबरदारीच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहेत. मालवण पालिकाही व्यापारी वर्गासोबत आहे, असेही कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.शासन-प्रशासन आपल्यापरीने कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्या उपाययोजना शक्य आहेत त्या सर्व अमलात आणणारच आहे. त्यासाठी आपल्याला तयार रहावे लागेल. त्याबरोबर आपणही अधिक खबरदारी घेऊन कोरोनाच्या जवळ न जाता त्याला दूर ठेवण्यासाठी स्वत:ची आचारसंहिता आखल्यास आपल्यासह कुटुंब व परिसराच्या दृष्टीने ती अधिक फायद्याची ठरेल. सर्वांनी याची अंमलबजावणी केल्यास आपला कोरोनामुक्त पॅटर्न इतरांना आदर्शवत ठरेल.आॅगस्ट महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीपूर्वी कोरोना संकटावर मात करण्यासाठी अथवा कोरोना संकट दूर ठेवण्यासाठी नागरिकांसह सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. सामाजिक संस्था, सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊया. कोरोनामुक्त मालवण पॅटर्न कायम राहण्यासाठी आपल्या सर्वांची साथ, सहकार्य जसे यापूर्वी देत आलात तसे यापुढेही महत्त्वाचे आहे, असेही नगराध्यक्ष यांनी स्पष्ट करीत प्रत्येकाने नियमांचे पालन केल्यास कोरोना दूर ठेवणे शक्य असल्याचे सांगितले.नगराध्यक्ष १४ दिवस होम क्वारंटाईन राहणारनगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या भावाचे काही दिवसांपूर्वी मुंबई येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यानंतर तातडीने ते मुंबईला गेले होते. त्याठिकाणी नगराध्यक्ष १२ दिवस राहिले. दोन दिवसांपूर्वी ते मालवणात आले असून कुटुंबासमवेत ते १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन झाले आहेत.