वेंगुर्ले : शिरोडा-वेळागर येथील डॉल्फिन हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेले सावंतवाडीचे काँग्रेसचे नगरसेवक सुधीर आडिवरेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सेवा न दिल्याने हॉटेलच्या साहित्यांची मोडतोड केली. तसेच हॉटेल मालकासह त्यांच्या पत्नीला आणि कामगारांनाही मारहाण केली. याप्रकरणी वेंगुर्ले पोलिसांत नगरसेवकांसह पंधराजणांविरुद्ध मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शिरोडा-वेळागर येथील डॉल्फिन हॉटेलमध्ये वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी सावंतवाडीहून नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांच्यासह पंधरा कार्यकर्ते येथे आले होते. बर्थ डे पार्टीत रात्रीच्या सुमारास गाण्याच्या तालावर सर्वजण नाचत होते. त्याचवेळी यातील काही युवक हॉटेल कामगारांकडून विविध खाद्यपदार्थांची मागणी करीत होते, पण सतत खाद्यपदार्थ देणे शक्य न झाल्याने हॉटेल मालक ब्रँडली अँथोनी डांटस यांच्यासह त्यांच्या कामगारास खाद्य व सेवा न दिल्याच्या रागातून जमाव करून मारहाण केली. हा धिंगाणा सुरू असताना यावेळी तेथे हॉटेल मालकाची पत्नी शिल्पा ब्रँडली डांटस आल्या. त्यांनी पती व कामगारांना सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना अरुण पडवळ याने त्यांच्या थोबाडीत मारुन मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत शिवीगाळ केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी हॉटेलच्या साहित्याचे नुकसान केले. या प्रकाराची माहिती शिरोडा पोलिसांना देण्यात आली. त्यांनी लागलीच याची माहिती वेंगुर्ले पोलिसांना दिली.घटनेचे गांभीर्य ओळखून वेंगुर्ले पोलिसांचा लवाजमा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर याप्रकरणी हॉटेल मालक ब्रँडली अँथोनी डांटस यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनीही घटनास्थळावरून नुकसान झालेल्या वस्तू तसेच अन्य वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. हा प्रकार मध्यरात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामधील काहीजणांनी मद्य प्राशन केल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार खाद्यपदार्थ उशिरा देण्यावरूनच घडला आहे. हे सर्व युवक नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांच्यासह वाढदिवस साजरा करण्यासाठीच आले होते, असेही पोलिसांनी सांगितले. हॉटेल मालक ब्रँडली डांटस यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुधीर आडिवरेकर, नेल्सन फर्नांडिस, संदेश टेमकर, रितेश हावळ, अक्षय कंटक, संतोष चराटकर, कॅजिटन पिंटो, अल्ताफ मुल्ला, परेश बांदेकर, अरुण पडवळ यांच्यासह अन्य पाचजणांवर गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी उशिरापर्यंत एकाही संशयिताला अटक केली नव्हती. रविवारी दिवसभर पोलिस घटनास्थळाचा पंचनामा करीत होते.या प्रकरणाचा अधिक तपास वेंगुर्ले पोलिस निरीक्षक मधुकर आभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र्र मोरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष गोसावी, पोलिस एल. व्ही. परब आदी करीत आहेत. (प्रतिनिधी)
‘बर्थ डे’ पार्टीतच नगरसेवकाचा धिंगाणा
By admin | Published: January 15, 2017 11:17 PM