ओरोस : कोविड लॅबचे लोकार्पण झाले. मेडिकल कॉलेजचे तीन महिन्यांनंतर उद्घाटन करायला देवेंद्र फडणवीस येतील. त्यांच्यामुळेच ही लॅब झाली. दरेकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सरकारकडे हट्ट धरला. पाच आमदारांनी निधी दिला.
ही अत्याधुनिक लॅब उभी राहणे म्हणजे जनतेला जीवदान दिल्यासारखे आहे. क्रांतीदिनी ही लॅब चालू होत आहे. येत्या तीन महिन्यांत मेडिकल कॉलेजचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली.कुडाळ तालुक्यातील पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल येथे आर्टिपीसीआर कोविड मोलेक्युलर लॅबचे लोकार्पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राणे बोलत होते.
राणे पुढे म्हणाले, लाईफ टाईम हॉस्पिटल हे डोंगरावर आहे. इथे इमारती दिसत आहेत. ७० एकरमध्ये हे हॉस्पिटल आहे. तर २२५ कर्मचारी काम करीत आहेत. डॉक्टर मेहनत घेत आहेत. येथे हॉस्पिटल चालविणे कठीण आहे. तुमची साथ मिळाल्यानेच माझे स्वप्न पूर्ण झाले. आता दीड तासात ९६ तपासण्या होतील. याचा मला अभिमान वाटतो. मेडिकल कॉलेज सुरू झाल्यावर १५० विद्यार्थी येतील.प्रवीण दरेकर म्हणाले, कोकणवासीयांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हे ते विसरले आहेत. निसर्ग वादळात आम्ही ३ दिवस कोकणात आलो. रत्नागिरीची लॅब बंद पडली होती. तिथे बोगस मशिनरी लावली आहे. दोन्ही जिल्ह्यांतील लोकांना पडवे येथील या लॅबचा उपयोग होईल.रवींद्र चव्हाण म्हणाले, सिंधुदुर्गात आलो त्यावेळी प्रशासनाची भूमिका पाहता आम्ही विरोधी पक्ष म्हणून लॅब हवीच असा हट्ट धरला. कोल्हापूर व गोव्यात जाणाऱ्या रुग्णांना आता तशी गरज भासणार नाही.
प्रसाद लाड म्हणाले, आम्ही ५ आमदारांनी १ कोटी निधी दिला. भाजपचे उद्दिष्ट आणि ध्येय समोर ठेवून कोरोना योद्धा म्हणून आम्ही काम केले. कोकणात आलो तेव्हा लॅब नव्हती. चाचणीला ८ दिवस लागत होते. नारायण राणेंनी परवानगी दिल्याने या ठिकाणी लॅब होत आहे. यावेळी मान्यवरांचा सत्कार नारायण राणे, निलेश राणे, नीतेश राणे यांनी केला.