सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरून अवैधरित्या होणाऱ्या वाळू वाहतूकीवर सावंतवाडी तहसिलदारांनी आज, मंगळवारी पहाटेपासून धडक कारवाई करत नऊ डंपर ताब्यात घेतले. हे सर्व डंपर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाळू घेऊन गोव्याच्या दिशेने जात होते. दरम्यान बांदा येथे ही कारवाई करण्यात आली.मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्याप्रमाणात वाळू ही विनापरवाना कुडाळ तालुक्यातून गोव्यात जाते. याविरोधात अनेक तक्रारी होत्या. या तक्रारीची दखल घेत अखेर सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांनी विशेष मोहीम राबविली. यात नऊ डंपरवर कारवाई करण्यात आली. त्यातील सात डंपर मधून गोव्याकडे वाळू वाहतूक होत होती. तर दोन डंपर मधून ओव्हरलोड काळा दगड नेण्यात येत होता. यातून तब्बल 12 लाख रुपयांचा दंड ही आकारण्यात आला आहे. तहसिलर श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसुल विभागाचे कर्मचारी तसेच तलाठी यांच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. यासाठी बांदा पोलिसांची मदत घेण्यात आली. चार दिवसांपूर्वी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी मळेवाड येथे चिरे वाहतूक करणारे डंपर पकडले होते .त्यानंतर तहसिलदाराकडून ही मोठी कारवाई करण्यात आली.
Sindhudurg: सावंतवाडीत अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई, ९ डंपर पकडले
By अनंत खं.जाधव | Published: September 26, 2023 3:38 PM