चिपळूण : समाजात शांतता नांदावी, समाजाचे मानसिक स्वास्थ्य अबाधित राहावे, यासाठी पोलीस प्रयत्न करतात. पोलीस हे रक्षक आहेत, सेवक आहेत, त्यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. रक्षक आणि शासक एकत्र आले तर सामाजिक शांती लाभते. आपण चांगल्या समाजाची निर्मिती करूया, असे आवाहन आर्ट आॅफ लिव्हिंगचे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक अमोल वाघळे यांनी केले. चिपळूण येथील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात चिपळूण विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रशिक्षण, गेले सहा दिवस सुरु होते. त्याची सांगता बुधवारी झाली. यावेळी वाघळे बोलत होते. या कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश मते, सावर्डेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्यासह अनेक कर्मचारी व महिला कर्मचारी उपस्थित होते. सहा दिवसात या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला नवीन प्रेरणा मिळाली. नवीन ऊर्जा प्राप्त झाली. याचा उपयोग आपण आपल्यासह आपल्या कुटुंबासाठी व समाजासाठी करु, असे सांगण्यात आले. दीपक ओतारी, गगनेश पटेकर, दीपक खामकर, कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या शिबिरामुळे आपल्यातील क्रोध कमी होण्यास मदत झाली. शरीरात बदल जाणवतो आहे. आपण आपल्यात बदल करु शकतो, हा आत्मविश्वास निर्माण झाला, असे सांगितले. शेवटच्या टप्प्यात भजन व प्रार्थना झाली. यावेळी आर्ट आॅफ लिव्हिंगचे अमोल वाघळे, अनिल खन्ना, डॉ. सुधा भारद्वाजन, प्रतिक खंडेवाला, ओंकार पाटणे, गौरांगी लाड, प्रल्हाद लाड, शक्ती चव्हाण, केतन मोरे, अजिंक्य राणे उपस्थित होते. त्यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. उपविभागीय अधिकारी गावडे यांनी जीवनात जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारली पाहिजे. जीवनात खूप आनंद आहे. जीवन सुसह्य व आनंदी निरामय होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपली संस्कृती महान आहे. तिचे आपण पाईक होऊया. आपल्या कामात सुधारणा करुन जनतेला चांगली सेवा देऊया, असे सांगितले. तर पोलीस निरीक्षक मकेश्वर यांनी या शिबिराचे महत्त्व विषद करताना, चांगल्या माणसाबरोबर आपण अधिक चांगले वागले पाहिजे, तर गुन्हेगाराबरोबर अधिकाधिक कठोर वागले पाहिजे, असे सांगितले. खामकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)
चांगल्या समाजाची निर्मिती करुया
By admin | Published: January 22, 2015 11:33 PM