सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या प्रत्येक योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच जनतेला त्याचा लाभ व्हावा यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांचाही तसाच अभ्यास असला पाहिजे. यासाठी आगामी पाच वर्षाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.जिल्हा नियोजन समिती सभागृहात मान्सून पूर्व आढावा व जिल्हा नियोजन कामांचा आढावा बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी ई.रवींद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त जिल्हा आधिकारी रविंद्र सावळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, जिल्हा पुरवठा अधिकारी धनाजी तोरस्कर, पोलीस उपअधिक्षक अनंत आरोसकर, प्रांताधिकारी संतोष भिसे यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे खातेप्रमुख या बैठकीला उपस्थित होते.पालकमंत्री केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनासाठी विशेष बाब म्हणून निवड करून तीनशे कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. त्यापैकी प्रथम शंभर कोटी जिल्ह्याला प्राप्त होणार आहेत. पर्यटन विकासाअंतर्गत जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्ताव बनवून त्याप्रमाणे कार्यवाही होणार आहे. प्रत्येक विभागाने ज्याप्रमाणे आराखडा बनवून दिला आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करावी. आपल्या कामाप्रती आत्मीयता ठेवून काम केल्यास कामे प्रभावी होतील अशी आशा केसरकर यांनी यावेळी व्यक्त केली. मान्सूनपूर्व प्रत्येक विभागांनी करावयाची कार्यवाही प्रभावीपणे करावी. वीज वितरण विभागाने प्रामुख्याने पावसाळ्यात विजेच्या तारा पडण्याचे प्रमाण लक्षात घेता वेळीच कार्यवाही करावी. विजेच्या तारा पडून होणारी जिवीतहानी ही सर्वात मोठी समस्या आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यालगतची वाहतुकीला अडथळा होणारी तसेच पावसामुळे पडणारी झाडांची पाहणी करून तत्काळ कार्यवाही करावी. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्यांमध्ये असणारे खड्डे प्राधान्याने बुजवावेत. आपत्ती काळात सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आदेशही पालकमंत्री केसरकर यांनी दिले.जिल्हाधिकारी ई. रवींद्रन म्हणाले, जिल्हा नियोजनमध्ये ज्या विभागांना निधीची आवश्यकता आहे. त्या विभागांनी तत्काळ मागणी करावी. असेही यावेळी सूचीत केले. आभार मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी मानले. (प्रतिनिधी)
पाच वर्षांचा मास्टर प्लॅन तयार करा
By admin | Published: June 05, 2015 11:47 PM