सिंधुदुर्गनगरी : समाजातील समस्या शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी स्वत:चे मॉडेल तयार करा आणि त्यातून येथील जनतेला व्यावसायिक संधी उपलब्ध करून द्या, असे आवाहन रिलायन्स जिओचे जनरल मॅनेजर डॉ. मुनीर सय्यद यांनी एमआयटीएम कॉलेजच्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलताना केले. यावेळी २३० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.मेट्रो पॉलिटन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयाचा दुसरा पदवीप्रदान कार्यक्रम रिलायन्स जिओचे जनरल मॅनेजर डॉ. मुनीर सय्यद यांच्या अध्यक्षतेखालीही झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष संतोष पाल, सचिव नेहा पाल, शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे प्राचार्य महाजन, संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश हुबळी, प्राध्यापक सूर्यकांत नवले, सर्व विभागांचे विभागप्रमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत स्वागत करण्यात आले. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात या महाविद्यालयात विविध विषयांच्या पदवीसाठी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी डॉ. मुनीर सय्यद म्हणाले की, आजचे जग हे तंत्रज्ञानावर आधारित आहे. डॉ. अब्दुल कलामांचे ध्येय ‘व्हिजन २०२०’वर आधारित अशी भारताची वाटचाल चालू आहे. स्मार्ट इंडिया, कौशल्य विकास योजना, उन्नत भारत, उन्नत महाराष्ट्र, तसेच डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया यासारखे विविध उपक्रम सरकार राबवित आहे. कुठलेही काम करायला कमीपणा मानू नका, स्वत:ची आवड, ओळख, सामाजिक भान म्हणून समाजात असणाऱ्या समस्या शोधून काढा. त्यावर स्वत: मॉडेल निर्माण करा. यावेळी त्यांनी आपल्याकडे खूप कार्यक्षेत्राची उपलब्धता आहे. आपण स्वत: जर याठिकाणीच व्यावसायिक संधी निर्माण करू शकलो तर निश्चितच येथील समाजासाठी खूप मोलाचे कार्य ठरेल, असे सांगितले. आत्मविश्वास ढळू देऊ नका, स्वत:वर विश्वास ठेवा, कामात सातत्य ठेवा, असा मौलिक संदेश सय्यद यांनी विद्यार्थ्यांना दिला. ते म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:ला ओळखून मला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा समाजाला कसा उपयोग होईल याकरिता प्रयत्न केले पाहिजेत. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्यप्राणी हा वेगळा असतो. आपली स्वत:ची कौशल्ये ओळखून त्याने सामाजिक भान राखून पुढील वाटचाल केली पाहिजे. स्वत:ला सिद्ध करण्याकरिता कोणताही ताणतणाव न घेता कठोर परिश्रम घेतले पाहिजेत. चुका झाल्यास त्या सुधारून मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेता आला पाहिजे, असा बहुमूल्य संदेश दिला. कार्यक्रमाच्या शेवटी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी याठिकाणी शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्था व्यवस्थापकांचे आभार मानले.
समस्येवरील उपायासाठी स्वत:चे मॉडेल तयार करा
By admin | Published: April 04, 2017 8:19 PM