वैभववाडी : वैभववाडीत सांस्कृतिक चळवळ निर्माण करून स्थानिक नवोदित कलाकारांचे भवितव्य घडविण्याचा आपण प्रयत्न करू, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले. टेम्पो असोसिएशनतर्फे आयोजित विविध स्पर्धांच्या उद्घाटन समारंभात राणे बोलत होते.थ्री व्हिलर, फोर व्हिलर, टेम्पो चालक- मालक असोसिएशनतर्फे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा, वेशभूषा स्पर्धा व जिल्हास्तरीय सोलो डान्स स्पर्धा आदी कार्यक्रम झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, माजी सभापती अरविंद रावराणे, डॉ. राजेंद्र पाताडे, असोसिएशनचे अध्यक्ष राजेश पडवळ, संजय लोके, प्रफुल्ल रावराणे, भैय्या कदम आदी उपस्थित होते.राणे म्हणाले, जिल्ह्यातील अन्य तालुक्यांप्रमाणे वैभववाडीत सांस्कृतिक चळवळ उभी राहिली नाही. त्यामुळे स्थानिक उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळू शकले नाही. त्यामुळे वैभववाडीतील स्टेजचा पुरेपूर वापर होईल, असे कार्यक्रम घेण्याचा आपला प्रयत्न राहील. टेम्पो असोसिएशनसारख्या अनेक संघटना सामाजिक उपक्रमातून उत्तरदायित्व पार पाडतात. त्यामुळे राजकीय पक्षांनीही यातून शिकण्याची गरज आहे. समाजाची सेवा करताना समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या संघटनांच्या प्रयत्नांना नेहमीच आपली साथ राहील, असेही नीतेश राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी स्नेहलता चोरगे, अरविंद रावराणे, डॉ. राजेंद्र पाताडे यांनी विचार मांडले. (प्रतिनिधी)
सांस्कृतिक चळवळ निर्माण करणार
By admin | Published: January 22, 2015 11:22 PM