आंबोली : येत्या काही काळात आंबोलीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ बनविले जाईल. याचा फायदा येथील घराघरांत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न राहतील, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले. आंबोली-सतीवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्र. पाचमध्ये रविवारी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या काही काळापासून जिल्ह्यातील एकमेव हिलस्टेशन असलेल्या आंबोली येथील पर्यटन विकास मंदावला आहे. येथे मुक्कामाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावल्याने इथल्या अर्थकारणावरही त्याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी चारच दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांसमवेत आंबोलीचा दौरा करत येथे आवश्यक सोयीसुविधांचा आढावा घेतला. येथील धबधब्याच्या विकासासह इतर काही प्रकल्प राबविणार असल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी येथे झालेल्या दौऱ्यात त्यांनी आंबोलीच्या पर्यटनाचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याचे सुतोवाच केले.यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ झाल्यावर त्याचा फायदा सर्वांना होईल, असे नियोजन केले जाईल. यासाठी ग्रामविकास खात्यातर्फे अत्यल्प व्याजदरात कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. जूनपर्यंत येथील सात धबधब्यांच्या ठिकाणी विकासात्मक कामे केली जातील. त्यामुळे एकाच धबधब्याच्या ठिकाणी होणारी गर्दी कमी होईल. यातून पर्यटकांचीही संख्या वाढू शकेल, असे पालकमंत्री म्हणाले. जिल्ह्याच्या पर्यटन विकासात आंबोली, चौकूळ आणि गेळे यांचे स्थान महत्त्वाचे असणार आहे. पर्यटन केवळ बाजारपेठेपुरतेच मर्यादित न राहता ते पूर्ण गावात पोहोचले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जातील. ग्रामविकास खात्यातर्फे दोन किंवा तीन टक्के व्याजदराने बँकांमार्फत कर्जपुरवठा करण्यात येईल. शाळेच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त या कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर आंबोली हायस्कूलचे अध्यक्ष शशिकांत गावडे, माजी सरपंच जगन्नाथ गावडे, उपसरपंच विलास गावडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष काशिराम गावडे, बाळा गावडे, जयराम गावडे, शाळा व्यवस्थापनाच्या नीलिमा गावडे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)हे माझे दुसरे घर :दीपक केसरकरमहादेवगड, कावळेसाद रस्त्याचे नूतनीकरण केले जाईल. सतीचीवाडी येथे पथदीपांची व्यवस्था करू. माझ्या आमदार निधीतून शाळेसाठी दोन संगणक दिले जातील. बसस्थानकावरील स्वच्छतागृहासाठी आमदार निधीतून साडेतीन लाख देणार आहे. आंबोली, चौकुळ, गेळे येथील लोकांचे माझ्याशी ऋणानुबंध आहेत. माझ्यासाठी हे माझे दुसरे घरच आहे.’
आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनविणार
By admin | Published: May 11, 2016 11:46 PM