कणकवली : आजचा दिवस सिंधुदुर्ग जिल्हा तसेच येथील क्रीडा क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. विनोद कांबळी ग्रामीण क्रिकेट अकादमी हा चांगला उपक्रम आहे.या अकादमीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे कठीण बाब होती. मात्र, आमदार नीतेश राणे यांनी हे आव्हान लिलया पेलले आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तो मनापासून खेळलात तर सिंधुदुर्गातही सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासारखे गुणवंत क्रिकेटपटू घडतील, असा विश्वास माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यक्त केला.
नीतेश राणे यांच्या पुढाकारातून कणकवली तालुक्यातील कलमठ येथे विनोद कांबळी ग्रामीण क्रिक्रेट अकादमी साकारली आहे. या अकादमीच्या प्रारंभप्रसंगी शुक्रवारी नीलेश राणे बोलत होते. यावेळी आमदार नीतेश राणे, क्रिक्रेटपटू विनोद कांबळी, स्वाभिमान पक्ष जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कलमठ सरपंच देविका गुरव, पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साटम, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती सायली सावंत, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा विखाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक, सुनील नाडकर्णी, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, कणकवली नगरपंचायतचे स्वाभिमानचे सर्व नगरसेवक, क्युरिएटर नदीम मेमन, अकादमीचे प्रमुख मार्गदर्शक ऋषी भावे, आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी नीलेश राणे पुढे म्हणाले, नीतेश राणेंनी आपल्या मतदारसंघात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम आणले आहेत. जो शब्द देऊ तो पूर्ण करू, ही नारायण राणे यांची शिकवण आहे. त्या शिकवणुकीनुसार कृती त्यांनी केली आहे. या क्रिकेट अकादमीचे दूरगामी परिणाम लवकरच दिसतील. दूरदृष्टी असणारा आमदार तुम्हाला लाभला आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही जपा. २०१९ मध्ये मीसुद्धा परत येणार असून, पुन्हा खासदार होणार आहे. त्यावेळी तुमची साथ महत्त्वाची आहे. नीतेश राणे हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत, जे आपला शब्द पूर्ण करतात. तसेच स्वखर्चाने जनतेसाठी नवनवीन उपक्रम राबवितात. विनोद कांबळी मोठ्या मनाचा माणूस आहे. ज्यांनी या अकादमीसाठी मेहनत घेतली त्या सर्वांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्यातला क्रिकेटर आज जागा झाला आहे. असेही ते म्हणाले.
यावेळी नदीम मेमन म्हणाले, मुंबईसारख्या मेट्रो शहरात क्रिकेटपटूंसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. याच धर्तीवर कलमठ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी साकारली आहे. नीतेश राणे यांच्यामुळेच जिल्ह्यातील क्रिकेटपटूंचे स्वप्न साकार झाले आहे. सिंधुदुर्गातील क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावेत, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. ऋषि भावे, दत्ता सामंत, भाग्यलक्ष्मी साटम यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नीलेश पवार यांनी केले. क्रिकेट अकादमीसाठी जागा देणाऱ्या ग्रामस्थांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.खेळाडूंमध्ये टॅलेंट ! नीतेश-नीलेश जोडी क्रिकेटप्रेमी: कांबळीनारायण राणे यांच्या प्रेरणेतून ही क्रिकेट अकादमी साकारली आहे. जिल्ह्यातील भावी पिढी घडली पाहिजे. यासाठी आमचे प्रयत्न आहेत. येथील तरुणांना ज्या क्षेत्रात आपलं करिअर घडवायचे आहे, त्यासाठी सहकार्य करून त्यांचे ते स्वप्न पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न रहाणार आहे. जिल्ह्यातील तरुणांमधील क्रिकेटची आवड पाता अशा उपक्रमाची गरज होती. या अकादमीत खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये खूप चांगले टॅलेंट आहे. त्यांना अत्याधुनिक सुविधा प्राप्त करून देणे ही आमची जबाबदारी आहे. जेव्हा जिल्ह्यातील एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जावर क्रिकेट खेळेल, तेव्हाच आम्ही साकारलेल्या या अकादमीचा उद्देश खºया अर्थाने पूर्ण होईल, असे यावेळी आमदार नीतेश राणे म्हणाले.माझ्या नावाने सुरू झालेली ही पहिली क्रिकेट अकादमी आहे. त्यामुळे आता कलमठ माझे झाले आहे. मला ग्रामीण भागात काय करणार? असा सातत्याने प्रश्न विचारला जात असे. ग्रामीण भागातून सचीन तेंडुलकर, विनोद कांबळी घडवायचे हे माझे स्वप्न आहे.मात्र, जागा आणि सुविधांअभावी हे स्वप्न साकारता येत नव्हते. नीतेश राणे यांच्यामुळे माझे स्वप्न साकार होत आहे. माझे मार्गदर्शन नेहमीच येथील खेळाडूंना मिळेल. या संधीचा फायदा खेळाडूंनी घ्यावा. नीतेश व निलेश राणे ही जोडी क्रिकेटप्रेमी आहे. मी फक्त बोलणार नाही. तर करून दाखवेन. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर व कपिल देवही कलमठ येथील क्रिकेट अकादमीत येणार आहेत. त्यांनी मला तसा शब्द दिला आहे. असे विनोद कांबळी यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्यात मुलींसाठीहीक्रिकेट प्रशिक्षण!या कार्यक्रमाच्यावेळी आर्या मडव या शाळकरी मुलीने आमदार नीतेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मुलींसाठी क्रिकेट प्रशिक्षण सुरु करण्याची मागणी केली होती. नीतेश राणे यांनी त्याची तत्काळ दखल घेत जिल्ह्यातील मुलींसाठीही लवकरच क्रिकेट प्रशिक्षण सुरु करण्यात येईल, असे यावेळी जाहीर केले.