वैभववाडी : लोरे नं. २ येथील भारत निर्माण योजनेच्या कामात सुमारे १८ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी पाणीपुरवठा समिती अध्यक्ष अमरसिंह रावराणे व सचिव अनिल नराम यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रफुल्लकुमार शिंदे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, लोरे नं २ येथे भारत निर्माण योजनेतून ३८ लाख १६ हजार ११३ रुपये अंदाजपत्रकीय रक्कमेची नळयोजना २००८ मध्ये मंजूर झाली होती. त्यानुसार पाणीपुरवठा समितीने या कामासाठी कळे (जि. कोल्हापूर) येथील सचिन दत्तात्रय देसाई यांना मक्तेदार म्हणून नेमले होते. समितीने मक्तेदार देसाई यांच्या खात्यात ३६ लाख रुपये वळविलेले असून प्रत्यक्षात झालेल्या कामाच्या मुल्यांकनापेक्षा ही रक्कम अधिक असल्याचे शिंदे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे या कामात अपहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. उपअभियंता शिंदे यांच्या तक्रारीनुसार संगनमताने शासकीय निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच अमरसिंह रावराणे व सचिव अनिल नराम यांच्याविरुध्द पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. बांधकाम सभापती दिलीप रावराणे यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यावर पंचायत समितीच्या सभांमध्ये हा विषय गाजला होता. तालुक्यात जलस्वराज्य, भारत निर्माण योजना, पेयजल योजनांमधून नळपाणी योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यापैकी बहुतांश जलस्वराज्य प्रकल्पातील अपहाराची प्रकरणे दडपून ठेवण्यात आली असल्याची चर्चा आहे. लोरेप्रमाणे कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
अपहार प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: May 15, 2016 12:17 AM