कणकवली : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याच्या अगोदरच जिल्ह्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते अनुपम कांबळी यांना कणकवलीतील त्यांच्या राहत्या घरी धमकी दिल्याप्रकरणी कणकवलीचे माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर, डामरेचे सरपंच बबलू सावंत यांच्यासह अन्य दोघांवर येथील पोलिस स्थानकात गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणावरून रविवारी काँग्रेसचे आमदार नीतेश राणे आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावून आपआपली बाजू मांडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नीतेश राणे यांनी अनुपम कांबळी यांची बाजू उचलून धरत जठार आणि भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कडक कारवाईची मागणी केली आहे, तर नीतेश राणे यांनी हे कुभांड रचल्याचा आरोप प्रमोद जठार यांनी केला आहे. याबाबत अनुपम कांबळी यांनी कणकवली पोलिस ठाण्यात रविवारी दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी रात्री १0.१५ वाजता शिशिर परुळेकर, बबलू सावंत व अन्य दोघे असे चौघेजण अनुपम कांबळी यांच्या घरी गेले होते. त्यांनी कांबळी यांची आई, भाऊ, वहिनी यांना दमदाटी केली. प्रमोद जठार अनुपम कांबळी यांना शोधत आहेत. अनुपम कुठे आहे? अनुपमने जठार यांची माफी मागितली नाही तर प्रमोद जठार काय आहे ते दाखवून देऊ असे धमकावले व राजेश कदम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी घरात घुसून धमकी दिल्याप्रकरणी शिशिर परुळेकर, बबलू सावंत यांच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत. (वार्ताहर) दहशतवाद कोण करते स्पष्ट झाले : नीतेश राणे आमदार जठार यांचा स्वीय सहायक आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन कांबळी कुटुंबीयांना धमकी देतो, हे लोक त्यांच्या घरामध्ये घुसतात व महिलांना धमकावतात. या आरोपींचा शोध घेऊन या आरोपींवर कडक कारवाई व्हायला हवी, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष अशी धमकी देतात यावरून सिंधुदुर्गात खरा दहशतवाद कोण करतेय? हे स्पष्ट होते. अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. नीतेश राणेंनी कुभांड रचले : प्रमोद जठार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी या घटनेचा इन्कार करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा पराभव दिसत असल्याने आमदार राणे यांनी अनुपम कांबळी धमकी प्रकरणाचे कुभांड आपल्या विरोधात रचले आहे, असा आरोप केला आहे. वातावरण काही काळ तंग जिल्हा परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज, सोमवार शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी सिंधुदुर्गात आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. रविवारी कांबळी प्रकरणावरून काँग्रेस आमदार नीतेश राणे आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी कणकवली पोलिस ठाण्यात हजेरी लावल्याने शहरातील वातावरण काही काळ तंग बनले होते.
भाजपच्या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा
By admin | Published: February 06, 2017 12:45 AM