fgसातारा : सोनगाव येथे झोपडीत कार घुसून रविवारी रात्री झालेल्या अपघातातील चालक पोलिओने अपंग असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या लहानग्या श्लोकवर सोमवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. झोपडीत राहणाऱ्या मदने कुटुंबातील दोन जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सोनगाव (तर्फ सातारा) येथे रविवारी रात्री सातच्या सुमारास मोटार झोपडीत घुसून अकरा महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला होता. श्लोक युवराज मदने असे या चिमुकल्याचे नाव आहे. मदने यांच्या पत्नी सोनाली (वय २२) आणि पुतणी पूर्वा विनोद मदने (वय ५) या दोघी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात युवराज लक्ष्मण मदने (वय ३५), उदय विनोद मदने (वय ३) आणि नीता विनोद मदने (वय ३५) हे तिघे किरकोळ जखमी झाले. अपघाताची नोंद काल रात्री उशिरा तालुका पोलीस ठाण्यात झाली होती.श्लोकचा मृत्यू झाल्यानंतर कारचालकावर सोमवारी सकाळी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुकुंद परशुराम साळुंखे असे चालकाचे नाव असून, त्याच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेदरकारपणे कार (एमएच ११ बीएच ९८०५) चालवून एकाच्या मृत्यूस व अन्य चौघांना जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी महेश भिकू नावडकर (रा. सोनगाव) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चालक मुकुंद साळुंखे याच्या डाव्या पायाला पोलिओमुळे अपंगत्व आले आहे. अशा स्थितीत त्याच्याजवळ वाहन चालविण्याचा परवाना होता का, याची खातरजमा पोलीस करीत असून, परवाना नसण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तसेच त्याच्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)भरल्या ताटावर बसलो; काळाने घास घेतला!सातारा : दोन कष्टाळू भाऊ, त्यांची बायकामुलं असे सगळेच रविवारी रात्री जेवायला बसले; पण घास घेण्यापूर्वीच काळाने लहानग्या श्लोकचा घास घेतला. ‘खडखड आवाज ऐकून भाऊ माझ्या मुलाला घेऊन बाहेर आला. माझा मुलगा वाचला; पण त्याचा श्लोक मात्र गेला,’ हे सांगताना विनोद मदने भावूक झाले होते.रुग्णालयात गंभीर दुखापतींशी लढत असलेली पाच वर्षांची पूर्वा ही विनोद यांची मुलगी, तर तीन वर्षांचा उदय हा मुलगा. जेवायला बसताना तो काकाच्या म्हणजे युवराज यांच्या मांडीवर बसला होता. घास घेणार एवढ्यात घराबाहेर ‘खडखड’ असा आवाज आला. मांडीवर बसलेल्या उदयला घेऊन युवराज घराबाहेर आले; त्याच वेळी त्यांच्या डोळ्यादेखत आणि त्यांना धक्का देत कार त्यांच्या घरात घुसलीही! आवाज ऐकून गावकरीही जमू लागले; पण कारच्या खाली अडकलेल्या कुटुंबीयांना बाहेर पडता येत नव्हते. संपूर्ण गाव एकवटला आणि सर्वांना कारमधून बाहेर काढण्यात आले. रिक्षा बोलावून जखमींना रुग्णालयात पाठविताना गावकऱ्यांची धावपळ उडाली. मदने कुटुंबाचं गावात घर आहे; पण काही कारणांमुळं विनोद आणि युवराज हे दोन भाऊ शेताजवळच झोपडी बांधून राहतात. सोनगाव-आसनगाव रस्त्याच्या एका बाजूला शेत, दुसऱ्या बाजूला घर. तीन भावांमध्ये मिळून अवघी पाऊण एकर जमीन. कष्टाने जगणारं हे कुटुंब एका भरधाव कारमुळं अक्षरश: विस्कटलं.विनोद सांगतात, ‘घरापासून जवळच रस्त्यावर एक खड्डा आहे. त्याच्या पुढं, घराच्या बाजूला मुरुमाचा ढिगारा. खडखडाटाचा आवाज ऐकल्यावर भावाने बाहेर येऊन पाहिलं, तेव्हा या ढिगाऱ्यावरून चक्क झेप घेऊनच कार झोपडीत घुसली.रात्रभर आक्रोश, धावपळ आणि दु:खानं वेढलेल्या सोनगाव ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी श्लोकला जड अंत:करणाने अखेरचा निरोप दिला. (प्रतिनिधी)संपूर्ण गाव रुग्णालयातअपघातग्रस्तांना बाहेर काढल्यावर कुणाला काय करावं, हेच कळत नव्हतं. जखमींना घेऊन कुणी जिल्हा रुग्णालयाकडे, कुणी खासगी रुग्णालयाकडे धावत निघाले. रात्रभर रुग्णालयाबाहेर संपूर्ण गावच जमलं होतं, असं विनोद यांनी सांगितलं.
बेदर‘कार’चालक पोलिओने अपंग!
By admin | Published: October 05, 2015 10:11 PM