सिंधुदुर्गनगरी : अपंग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा,, यासाठी नियमित अपंगांचे शिक्षण घेतलेल्या शिक्षकांकडून अपंग विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील अपंग विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी एकदिवसीय धरणे आंदोलन छेडले.अपंग विद्यार्थी व पालक यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करीत याबाबतचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांना सादर करण्यात आले. या निवेदनात असे नमूद आहे की, शिक्षणाचा अधिकार आरटीई २००९ नुसार सर्व बालकांना मोफत शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यानुसार ० ते १८ वयोगटांतील प्रत्येक मुला-मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे देण्यात येते. त्यामुळे प्रत्येक बालकाला मातृभाषेतूनच शिक्षण मिळणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात सुमारे ४ हजार ७२१ अपंग मुले आहेत. या मुलांना शासनाकडून कुबड्या, कमोड चेअर, व्हीलचेअर, चष्मे, श्रवणयंत्र, मदतनीस भत्ता, आदी सेवा देण्यात येतात. मात्र, सर्वशिक्षा अभियानांतर्गत अपंग मुलांसाठी विशेष शिक्षकाची सेवा अत्यल्प कालावधीसाठी त्यांच्या नियोजनानुसार मिळते.परिणामी, या मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही. त्यामुळे या अपंग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी नियमित अपंगांचे शिक्षण घेतलेल्या शिक्षकांकडून जिल्ह्यातील अपंग विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण देण्यात यावे, अपंग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अपंग शिक्षणातील पदवीधारक शिक्षकाची कायमस्वरूपी नेमणूक करावी, या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अनुकूलित अभ्यासक्रम तयार करण्यात यावा. अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षण विभाग स्वतंत्र स्थापन करण्यात यावा. कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मातृभाषेतून (खुणांची भाषा) शिक्षण द्यावे, तसेच विद्यार्थ्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील अपंग विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.यावेळी रूपाली पाटील, प्रकाश नाईक, सुनेत्रा खानोलकर, संगीता पाटील, संतोष मोरये, समीर परब, सरिता पांजरी यांच्यासह पालक व अपंग विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अपंग विद्यार्थ्यांचे धरणे
By admin | Published: February 03, 2015 9:51 PM