माणगाव खोऱ्यात दबा धरून बसलेल्या आणि येथील शेतकऱ्यांच्या जिवावर बेतणाऱ्या तीन रानटी हत्तींना गतवर्षी शासनाने मोहीम राबवून पकडले. त्यावेळी वाटलेलं की, सिंधुदुर्गवरील हत्तींचे संकट आता दूर होईल. मात्र, तिलारी खोऱ्यात असलेल्या हत्तींना पकडण्याची मागणी त्याच मोहिमेनंतर केली जात होती. मात्र, त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे तिलारी खोऱ्यातील या हत्तींनी गेले महिनाभर दहशत माजवायला सुरुवात केली आहे. हत्तींच्या वावराने दोडामार्गमधील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शासनाने हत्ती पकड मोहीम राबवून या हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची गरज आहे.दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे परिसरात या हत्तींनी धुडगूस घातला असून, हत्तींना आवर घालण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे. अन्यथा, हे हत्ती ‘त्या’ हत्तींप्रमाणे पुन्हा सिंधुदुर्ग जिल्हावासियांचे जगणे बेचैन करणार आहेत. सिंधुदुर्गात हत्तींनी गेल्या दहा वर्षांत, म्हणजेच सन २००४ पासून सन १0१४ पर्यंत सातजणांचे बळी घेतले आहेत, तर १५ ते २0 जणांना जखमी केले होते. त्यानंतर माणगाव खोऱ्यात शासनाने हत्ती पकड मोहीम राबविली. या मोहिमेत कर्नाटक येथील पथकाने तीन हत्तींना आठ दिवसांच्या आतच जेरबंद केले होते. त्या तीन हत्तींपैकी दोघांचा मृत्यू झाला. तर एक हत्ती सध्या कर्नाटक येथे प्रशिक्षण घेत आहे. सन २००२ ते ०३ च्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्नाटक राज्यातून सहा हत्तींचा कळप तिलारी परिसरात दाखल झाला होता. त्यानंतर दहा वर्षांत या हत्तींनी अर्ध्याअधिक जिल्ह्यात आपले साम्राज्य पसरविले होते. प्रत्येक तालुक्यात नुकसान करीत हत्तींचा कळप पुढच्या ठिकाणी जात होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती दाखल झाल्यानंतर या हत्तींनी दोडामार्गमधून नुकसान सत्रास सुरुवात केली. तर पहिला बळी शिरंगे येथील शंकर बाळा गावडे यांचा १० एप्रिल २००४ मध्ये घेतला. तेव्हापासून हत्ती हल्ल्यात मृत झालेल्यांची संख्या सात, तर जखमींची १५ च्या घरात जाऊन पोहोचली होती. या हत्तींना परतविण्यासाठी वनविभागाने नवनवीन उपाय केले, मोहिमा राबवल्या; पण हे सर्व उपाय अपुरे पडले होते. त्यांनी वनविभागावर विजयच मिळविला होता. त्याचदरम्यान गतवर्षी सन २0१५ मध्ये शासनाने कर्नाटक येथील पथकाव्दारे माणगाव खोऱ्यात हत्ती पकड मोहीम राबवून तिन्ही हत्तींना यशस्वीरित्या पकडले होते. याच आठवड्यात दोडामार्ग तालुक्यात चंदगड येथून नव्याने तीन हत्तींचा कळप दाखल झाला आहे. या हत्तींच्या कळपाने वीजघर, बांबर्डेत नुकसानसत्र सुरूच ठेवले आहे. गेल्या चार दिवसांपासून हत्तींनी या भागात धुडगूस घालायला सुरुवात केली आहे. हत्तींच्या येण्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता संकट पुन्हा घोंगावयला सुरुवात झाली आहे.शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळू नकाहेवाळे, घाटिवडे व बाबरवाडीत गेले वर्षभर हत्तींचा जीवघेणा उपद्रव सुरू आहे. येथील शेतकरी व शेती दिवसागणिक उद्ध्वस्त होत आहे. थेट लोकवस्तीत घुसून हत्ती नुकसान करीत असल्याने कधी कुणाचा बळी जाईल, याचाही नेम नाही. तरीही जिल्ह्याचे पालकमंत्री व या मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत हे हत्तींना पकडण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करून घेऊ शकले नाहीत. यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत यांनी हेवाळेवासियांना मोठी आश्वासने दिली होती. मात्र, ती सर्व आश्वासनेच राहिली आहेत. हेवाळेवासीय ग्रामस्थांनी मोठ्या अपेक्षेने प्रशासनाला साथ दिली. मात्र, आता सहनशीलतेने परिसीमा गाठली आहे. त्यामुळे पालकमंत्री, खासदार व वनखाते यांनी तातडीने हत्ती बंदोबस्ताबाबत ठोस निर्णय घेऊन हत्तींची पकड मोहीम राबवून तत्काळ हलवावे. अन्यथा, येत्या आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पालकमंत्री, खासदार व उपवनसंरक्षक यांना हत्तीची प्रतिकृती भेट देऊन निषेध नोंदविला जाईल. त्यानंतर लोकशाही मार्गाने समस्त गावकऱ्यांना घेऊन उपवन वनसंरक्षक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला जाईल. दरम्यान, शेतकऱ्यांकडे प्रत्येक नुकसानीचा पंचनामा करताना नवे हमीपत्र मागितले जात आहे. नुकसान भरपाईसाठी हमीपत्राची किमान एक वर्ष वैधता असावी कारण एकाच शेतकऱ्याचे अनेकदा नुकसान होते. आणि प्रत्येक वेळेला तहसीलदार कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांना हमीपत्र करणे परवडणारे नाही. शासनाने यातून ग्रामस्थांची होणारी पिळवणूक थांबवावी. - संदीप देसाई, सरपंच, हेवाळे, दोडामार्ग‘हत्तीप्रश्न’ नेहमीचीच डोकेदुखीअपुरा कर्मचारी वर्ग, त्यात हत्ती बंदोबस्तासाठी दररोज कर्मचाऱ्यांची एक तुकडी जंगलात पाठवावी लागते, त्यामुळे वनविभागापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हत्तींनी कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. नुकसान भरपाईपेक्षा मोहीम राबविली असती तर बरे झाले असते. पण, ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय...’ अशीच काहीशी अवस्था वनविभागाची झाली आहे. वीजघर, घाटिवडे या दोडामार्ग तालुक्यातील भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून तळ ठोकलेले हत्ती दिवसा जंगलात, तर रात्री लोकवस्तीत असलेल्या भात शेतीत व बागायतीत शिरकाव करीत आहेत.वीजघर, घाटिवडे या दोडामार्ग तालुक्यातील भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून तळ ठोकलेले हत्ती दिवसा जंगलात तर रात्री लोकवस्तीत असलेल्या भात शेतीत व बागायतीत शिरकाव करीत आहेत.माड, केळी, सुपारी, शेती नेस्तनाबूत करीत असल्याने वर्षानुवर्षे सांभाळ केलेल्या बागायतींचे हत्तींनी गेल्या काही महिन्यांत नुकसान केल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.वनविभागाकडून दिली जाणारी नुकसानभरपाई अत्यल्प असल्याने त्यातून बागायतीचा खर्च व उत्पन्नाचे पैसेही मिळत नाहीत. भातशेतीला अल्प दर असल्याने त्याचा काहीच फायदा शेतकऱ्यांना होत नाही. नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय, तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे ती नुकसानभरपाई काहीच कामाची नाही.
सिंधुदुर्गमध्ये हत्तींचे संकट पुन्हा घोंगावतेय
By admin | Published: September 17, 2016 11:16 PM