वेंगुर्ले, शिरोडा : मुंबईहून मुळगावी आलेल्या आरवली बांधवाडी येथील उद्योजक दिगंबर आर्लेकर हे गुरुवारी दुपारी गोळीबाराचा सराव करीत असताना त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधुन सुटलेली एक गोळी शेजारीच आजगांव भोमवाडी येथे क्रिकेट खेळणारा युवक उमेश रामचंद्र बाळे (वय ३३) च्या पोटाला लागली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्याला ओरोस जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी उद्योजक आर्लेकर यांना बेदम चोप दिला.आरवली-बांधवाडी येथील दिगंबर आर्लेकर गोळीबारचा सराव करत होते. त्यातील एक गोळी आजगांव-भोमवाडी येथील मळ्यात क्रिकेट खेळणा-या उमेश बाळे या युवकाच्या पोटास घासून गेली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत खेळणा-या खेळाडूंनी तत्काळ त्याला शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेची तक्रार मिळताच वेंगुर्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सावंतवाडीतील उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस हे घटनेचे गांर्भीय पाहून घटनास्थळी दाखल झाले.वेंगुर्ले तालुक्यातील आरवली-बांधवाडी भागात मुंबईत उद्योजक असलेल्या दिगंबर आर्लेकर यांचे घर आहे. ते आपल्या जमिनीत घराचे बांधकाम करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आले होते. मुंबईतील उद्योजक असल्याने त्यांनी स्वसंरक्षणासाठी परवाना काढून रिव्हॉल्वर घेतले आहे. सराव करीत असताना त्या भागापासून पाचशे मीटर अंतरावर क्रिकेट खेळणाऱ्या बाळे या तरुणाच्या पोटास गोळी घासून गेली. त्यामुळे तो जखमी होऊन विव्हळत खाली पडला. तो जखमी झाल्याचे लक्षात येताच इतर खेळाडू भयभीत झाले. मात्र, काहींनी पुढाकार घेत युवकाला तातडीने रुग्णालयात हलविले. या घटनेनंतर आरवली तसेच परिसरातील युवकांनी आर्लेकर यांना बेदम चोप दिला. यानंतर घटनास्थळी शिरोडा पोलिस दाखल झाले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले आणि वेंगुर्ले पोलिसांना माहिती दिली. वेंगुर्ले पोलिस फौजफाट्यासह शिरोड्यात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळांची पाहणी केली. तसेच युवकांची साक्ष नोंदविली. त्यानंतर दिगंबर राजाराम आर्लेकर, दिलीप पांडुरंग देवान (४१, रा. सावंतवाडी) जोतिराम दत्ताराम गुरव (२६ रा. कोल्हापूर), महेश कृृष्णा गवंडे (४२) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा पर्यंत आर्लेकरसह संशयितावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आर्लेकरने स्वत:ला झालेल्या मारहाण प्रकरणी कोणतीही तक्रार दिली नाही, असे पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)चौकट शिरोडा परिसरात एकच खळबळदिगंबर आर्लेकर हे शिरोडा आरवली परिसरातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. आरवलीमधील प्रत्येक कामात त्यांचा पुढाकार असतो. मात्र गुरूवारी त्यांच्याच रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून घडलेल्या प्रकाराने शिरोडा परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
चुकून उडालेली गोळी लागून खेळाडू गंभीर
By admin | Published: December 22, 2016 11:09 PM