ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. : भाजपाच्या कलमठ जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार प्रज्ञा ढवण या प्रचाराचा वेळ संपला असताना प्रचार करीत होत्या. त्यांना याबाबत जाणीव करून देणाऱ्या ग्रामस्थावरच त्यांची काहीही चूक नसताना गुन्हा दाखल झाला आहे. ढवण यांनी आचारसंहिता भंग करूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. आपण चूक करून दुसऱ्यावरच गुन्हा दाखल करणे हा चोराच्या उलट्या बोंबा असाच प्रकार आहे. अशी टीका काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी केली आहे.
याबाबत त्यानी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या निवडणुकी मध्ये शिवसेना- भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याने प्रज्ञा धवण रात्री 1 वाजता वरवडे येथे प्रचार करून पैसे वाटप करताना काँग्रेस कार्यकर्त्याना आढळून आल्या. त्यामुळे प्रचाराची वेळ संपली आहे .तुम्ही येथून परत जा असे सांगण्याचा प्रयत्न त्या कार्यकर्त्यांनी केला. त्यांच्यावरच आता गुन्हा दाखल झाला आहे.सत्तेच्या बळावर ज्यानी आचारसंहिता भंग केला त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता उलट ज्यांचा काहीही दोष नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे राज्यात हुकुमशाही चालली आहे. असे आम्हाला वाटते.
वरवडे येथील घटनेची तक्रार देताना गाडीचा चालक व प्रज्ञा ढवण यांच्या वक्तव्यात तफावत दिसून येते. दोघेही एकाच गाडीत असताना वेगवेगळी तक्रार कशी दिली जाते.याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. यापूर्वीही प्रज्ञा ढवण यांच्यावर अनेक गुन्हे नोंद झालेले आहेत. याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. पोलिसांवर दबाव आणत प्रमोद जठार व राजन तेली संबधित गुह्यात खोटी कलमे दाखल करण्यासाठी प्रयत्न करीत होते. यावरुन ढवण यांना पुन्हा खुलेआम प्रचार करण्यासाठी त्यांना मदत करायची होती असे दिसते याची पोलिसांनी नोंद घ्यावी. तसेच पोलिसांनी यावर योग्य ती कारवाई करावी.
भाजपला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्याकडून काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र जनता भाजपवर नाराज असल्यामुळे ती घरचा आहेर दिल्याशिवाय रहाणार नाही.असेही या पत्रकात म्हटले आहे.(प्रतिनिधी)