कणकवली: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना यावर्षीही खड्ड्यातूनच प्रवास करावा लागला. मूळगावी पोहचण्यासाठी १८ ते २२ तास प्रवासासाठी लागले. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असूनही कोकणचा विकास रखडला आहे. स्थानिक आमदार किंवा कोणत्याही मंत्र्यांनी जनतेला दिलेले आश्वासन ते पाळू शकत नाहीत, ही खरी शोकांतिका आहे. अशी टीका मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, सत्ताधारी पक्षातील आमदार, राज्याचे बांधकाम मंत्री यांनी कोकणातील महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरळीत करू असे आश्वासन देत फक्त गाजावाजा केला. मात्र, त्यांना ते शक्य झाले नाही. मुंबई- गोवा महामार्गाची दुरावस्था झाल्याने चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे गाड्या नियमित वेळेपेक्षा ४ ते ५ तास उशिराने धावत आहेत. सत्ताधारी पक्षाने तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी बस व रेल्वेची मोफत सेवा उपलब्ध करून दिली होती. तशीच सोय परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध करून द्यावी. तसे झाले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू...मग नितेश राणेंनी मनसेला सल्ला द्यावाजनतेने किती काळ महामार्ग पूर्ण होण्याची वाट पाहावी? आता जनतेला महामार्गाने प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जनतेसाठी मनसेला आता रस्त्यावर उतरूनच संघर्ष करावा लागेल. आमदार नितेश राणे हे, 'मनसेने सबुरीने घ्यावे' असे सल्ले देत आहेत. मात्र, त्यांनी आधी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. त्यानंतर मनसेला सल्ला द्यावा. चिपी विमानतळावरुन केंद्रीय मंत्रीराणेंना प्रश्नआमदार राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे लवकरच केंद्रीय उड्डाण मंत्री यांची चिपी विमानतळाबाबत भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी विमानतळाच्या उद्घाटनाचे श्रेय नारायण राणेंनी घेतले होते. मग मधल्या काळात विमान सेवा बंद होती. त्यावेळी ती सुरू करण्यासाठी केंद्रीय उड्डाण मंत्री यांची भेट त्यांनी घेऊ नये. असे महाराष्ट्र शासनाने किंवा राज्यकर्त्यांनी राणे यांना सांगितले होते काय? असा सवालही उपरकर यांनी यावेळी केला.
..'ही' खरी शोकांतिका, मनसे नेते परशुराम उपरकरांचे टीकास्त्र
By सुधीर राणे | Published: September 25, 2023 4:52 PM