बांदा : गेल्या काही वर्षात तेरेखोल नदीपात्रात मगरींच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून नदीपात्रात या महाकाय मगरी सहज दृष्टिस पडत आहेत. या मगरींकडून पाळीव जनावरे तसेच माणसांवरही हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने तेरेखोल नदीकिनाऱ्यालगतच्या गावांतील लोकांना या मगरींच्या दहशतीच्या छायेखाली रहावे लागत आहे. या मगरींचा सर्वाधिक धोका नदीपात्रातील इन्सुली व वाफोली गावांना असून याठिकाणी महाकाय विशाल मगरींचे वास्तव्य आहे. तेरेखोल नदिपात्रात मगरींचे वाढते प्रस्थ असूनही वनखाते मात्र कायद्याकडे बोट दाखवून या मगरींच्या बंदोबस्ताबाबत असमर्थता दाखवत आहे. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना या मगरींना पकडण्याचे तंत्र अवगत नसल्याने या मगरींचा वावर मानवी वस्तीत वाढला आहे. तेरेखोल नदीपात्रात इन्सुली येथे मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणी तब्बल १५ ते २0 फूट लांबीच्या महाकाय मगरी कळपाने किनाऱ्यावर पहुडलेल्या दृष्टिस पडतात. याठिकाणी तब्बल ४0 ते ५0 मगरी कायमस्वरुपी वास्तव्यास असल्याचे स्थानिक सांगतात. या मगरींचा वावर याठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने स्थानिक या नदीपात्रालगत जाण्यासही धजावत नाहीत. तेरेखोल नदीपात्र हे खोल व विस्तीर्ण असल्याने नदीपात्रात मगरींची पैदास ही मोठ्या प्रमाणात झाली आहे. जानेवारी ते एप्रिल महिना हा थंडीचा हंगाम मगरींच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळेच या मगरींचा मुक्त वावर नदीपात्रात पहावयास मिळतो. मादी मगर ही एका वेळेला २0 ते २५ पिल्लांना जन्म देते. त्यामुळेच तेरेखोल नदीपात्रात मगरींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वनखात्याच्या अंदाजानुसार तेरेखोल नदिपात्रात ५00 च्या वर छोट्या व मोठ्या मगरी आहेत. यातील काही मगरी या १५ फुटांहून अधिक लांबीच्या आहेत. या मगरींचा वावर दिवसाढवळ्या नदिकिनाऱ्यालगत असल्याने घबराटीचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षात बांदा शहरासह नदीकिनाऱ्यालगतच्या गावांत मानवी वस्तीत मगरींची पिल्ले सापडली होती. पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहून आल्याने ही पिल्ले मानवी वस्तीत शिरली होती. वन अधिनियम कायद्यानुसार मगरींना मारता किंवा जायबंदी करता येत नसल्याने वनखाते या मगरींचा बंदोबस्त करण्यास असमर्थ ठरत आहे. तसेच मगरींना हुसकावून लावणे तसेच इतर ठिकाणी स्थानबध्द करण्याचे तंत्र वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना अवगत नसल्याने वनखाते या मगरींसमोर हतबल ठरत आहे. मगर हा पाण्यात राहणारा प्राणी असल्याने या मगरींना पाण्यात जाऊन पकडणे हे धोकादायक आहे. तेरेखोल नदिपात्रातील काही भाग हा मगरींसाठी संरक्षित करावा अशी मागणी मध्यंतरी होत होती. मात्र नदीपात्र हे विस्तीर्ण व विखुरलेले असल्याने व नदिपात्रात सर्वत्रच मगरींचा वावर असल्याने नदीपात्रातील एका भागात 'मगर पार्क' करणे ही चुकिची संकल्पना ठरु शकते. यासाठी वनखात्याने यावर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे. (प्रतिनिधी) मगरींची दहशत : शेतकऱ्यांवर संकट ४तेरेखोल नदीपात्रात आजघडीस शेकडो मगरी आहेत. गेल्या काही वर्षात शेर्ले, कास, मडुरा, इन्सुली, बांदा परिसरात पाळीव गुरे, कुत्रे यांचा फडशा मगरींनी पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. महिनाभरापूर्वी इन्सुली-कुडवटेंब येथे भली मोठी मगर घरात घुसल्याची घटना घडली होती. मडुुरा येथे मगरीने शेतकऱ्यावरही हल्ला केल्याने शेतकरी गंभीररीत्या जखमी झाला होता. मगरींची दहशत वाढल्याने शेतकऱ्यांना नदीतिरालगत शेती करणे देखिल जीवावर बेतणारे ठरत आहे.
तेरेखोल नदीपात्रात मगरींचा वावर
By admin | Published: January 09, 2016 11:50 PM