कणकवली : योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ११६व्या जन्मोत्सव सोहळ्याने अवघी कनकनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. नामजप, आरती, भजने यातून बाबांचा जयघोष सुरू आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दरदिवशी भाविक या उत्सवाला कणकवलीत येत आहेत.बुधवार आणि गुरुवार असे उत्सवाचे दोन दिवस भक्तांचा जनसागरच कणकवलीत अवतरणार आहे. बुधवार १५ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत ११६ रक्तदाते या उत्सवानिमित्त रक्तदान करणार आहेत. भालचंद्र महाराजांच्या जन्मोत्सवाचा प्रत्येक दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा होत आहे.
पहाटेच्या काकड आरतीपासून भाविकांची पावले बाबांच्या संस्थानात वळतात ती रात्री उशिरापर्यंत समाधी दर्शनासाठी लगबग सुरूच असते. विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच भाविकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमही होत आहेत.सोमवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत दशावतार कलाकारांचा संयुक्त दशावतार झाला. यामध्ये शंभूचे लग्न हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. त्याला रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद देत मोठ्या संख्येने हा नाट्यप्रयोग पाहिला. तर मंगळवारी सायंकाळी श्री देव रवळनाथ प्रासादिक नाट्यमंडळ अंतर्गत श्रींची इच्छा कलामंच तोंडवली यांचे बाळ कोल्हटकर लिखित तीन अंकी सामाजिक संगीत नाटक दुरितांचे तिमिर जावो झाले.
बुधवार १५ जानेवारी रोजी सायंकाळी श्री सद्गुरू माऊली महाराज वाळुंजकर यांच्या भक्त पूनम नळकांडे आणि सहकारी (पुणे) यांचा भक्तिगीत, अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे.परमहंस भालचंद्र महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त परिसर आणि घर सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त कणकवली बाजारपेठ आकर्षक अशा विद्युत रोषणाई आणि पताकांनी सजली आहे. ठिकठिकाणी परमहंस भालचंद्र महाराज यांची प्रतिकृती असलेले देखावे साकारण्यात आले आहेत. भालचंद्र महाराजांचा हा उत्सव भाविकांसाठी चैतन्याची आणि मांगल्याची पर्वणी ठरला आहे.