कणकवली : ५00 व १ हजाराच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांनी बँकांमध्ये गर्दी केली होती. रविवारी सकाळपासूनच बँकासमोर रांगा लागल्या. येथील स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, देना बँक, अभ्युदय बँक, बँक आॅफ इंडिया आदी बँकांमध्ये पैसे भरण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. कणकवली शहरातील बँकांमध्ये रविवार असूनही कोटीच्या घरात पैसे भरण्यात आले. मात्र बँकांमध्ये सुट्या पैशांची चणचण भासली. आज पाचव्या दिवशी गर्दी कायम आहे. सोमवारी गुरूनानक जयंतीनिमित्त बँका बंद राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५00 व १ हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्याची घोषणा मंगळवारी ८ नोव्हेंबरला केल्यानंतर बँकांमध्ये ५00 व १ हजार रुपयांच्या नोटा भरण्यासाठी गर्दी कायम आहे. रविवारी सर्व बँका सुरू होत्या, त्यामुळे अनेक ग्रामस्थांनी बँकांमध्ये गर्दी केली होती. आज रविवार असूनही मंगळवारप्रमाणे कणकवलीची बाजारपेठ गजबजलेली दिसून आली. रविवारी बँका सुरू राहणार असल्याचे बँकांनी अगोदरच जाहीर केले असल्यामुळे रविवारी बँकांमध्ये गर्दी दिसून आली. आजच्या गर्दीमध्ये ग्रामीण भागातील लोकांचा जास्त प्रमाणात भरणा होता. बाजारपेठेत ५00 व १ हजारच्या नोटा स्वीकारत नसल्यामुळे ग्राहकांची पंचाईत झाली आहे. पेट्रोल पंप, पोस्ट खाते, शासकीय रूग्णालये आदी ठिकाणी ५00 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील, असे सरकारने जरी जाहीर केले असले तरी पेट्रोल पंपावरही वाहनचालकांची मुस्कटदाबी सुरूच आहे. ५00 रुपयांचे पेट्रोल घ्या, पैसे सुटे नाहीत, अशी अट पेट्रोल पंपचालकांनी लादल्यामुळे वाहनचालकांची कुचंबणा झाली आहे. (वार्ताहर) घोळ सुरुच राहणार : लोकांची फरपट ३0 डिसेंबरपर्यंत नोटा बदलून मिळतील, असे केंद्र सरकारने जाहीर केले असले तरी लोकांची फरपट मात्र सुरूच आहे. कणकवलीसह जिल्ह्यात सुट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल पंप, शाळा, पोस्ट कार्यालय, शासकीय रुग्णालयत आदी ठिकाणी ५00 व १ हजारच्या नोटा बदलून मिळतील, असे सरकारने जाहीर केले असले तरी पेट्रोल पंपचालक, पोस्ट, शासकीय रुगणालय या ठिकाणी सुटे पैसे मिळत नसल्यामुळे ५00 रुपये बदलून मिळण्याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे बँका सोडून इतर कुठे ५00 रुपये स्वीकारतील यावर लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे नोटा रद्दच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांची ससेहोलपट सुरूच आहे.
ंपाचव्या दिवशीही गर्दीच
By admin | Published: November 13, 2016 11:27 PM